

पारनेर: तालुक्यात शनिवारी (दि.27) रात्री ते रविवारी (दि. 28) पुन्हा अतिकवृष्टी झाली. दोन दिवसांत जवळपास 70 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत तालुक्यात 301 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे तालुक्यातील 35 ते 40 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
भाळवणी, टाकळी ढोकेश्वर, पळशी, सुपा, पळवे खुर्द या मंडलांत दोन दिवसात जास्त, तर निघोज व वडझिरे या मंडलांत कमी पावसाची नोंद आहे. गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला असून, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी मध्यरात्री दरम्यान ढगफुटी झाली.पावसाने पारनेर-विसापूर रस्त्यावर बाबुर्डी येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता बंद होता. त्यामुळे ग्रामस्थ, औद्योगिक वसाहतीमधील कामगार, दूधउत्पादकांचे अतोनात हाल झाले. (Latest Ahilyanagar News)
गेली पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यातील नारायणगव्हाण व वाडेगव्हाण परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. शेतकऱ्यांची शेतातील उभी पिके भुईसपाट झाली. सलग पंधरा दिवस पाऊस सुरू असून यामध्ये कांदा व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे सर्व शेतकऱ्यांची दैणा उडाली आहे.
या पावसात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शासनाने पिकांचे तातडीने पंचनामे करून एकरी 50, 000 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत, प्रतिहेक्टर 8 हजार व एकरी 3.500 मदत जाहीर करून शासनाच्या वतीने शेतकऱ्यांचा तोंडाला पाने पुसली आहेत.
नुकसानीचे पंचनामे सुरू
तालुक्यात 131 गावे आहेत. सर्व गावांमध्ये खरीप पिकांचे व नवीन कांदा लागवडींचे नुकसान झाले आहे. अंदाजे 35 ते 40 हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अंतिम आकडेवारी नुकसानेची पंचनामे पूर्ण झाल्यानंतर येईल. पंचनामे करण्याचे काम चालू आहे. अजून किमान पाच ते सहा दिवस लागणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गजानन घुले यांनी दिली.
मंडलनिहाय पावसाची आकडेवारी
पारनेर 306 मिलीमीटर, भाळवणी 359.5, सुपा 281.1, वाडेगव्हाण 320.1, वडझिरे 213.8, निघोज 195.8, टाकळी ढोकेश्वर 339.9, पळशी 393.1, कान्हूरपठार 260.9, पळवे खुर्द 341.1, असा तालुक्यात एकूण 301.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.