

अहिल्यानगर : जिल्ह्यात जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत अकरा टक्के तुटीचा पाऊस झाला. सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा संपत नाही तोच पावसाने जोरदार आगमन करीत जिल्हाभरात हाहाकार उडवून दिला. पाथर्डी, शेवगाव, नगर आदी तालुक्यात होत्याचे नव्हते करून टाकले. पुन्हा शनिवारी आणि रविवारी सर्वदूर हजेरी लावत पावसाने आतापर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक केले. गेल्या पंधरा दिवसांत तब्बल 306.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एकट्या पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक 556.7 मिलिमीटर पाऊस झाला. (Latest Ahilyanagar News)
यंदा जून महिन्यापासूनच पावसाने दडी मारण्यास प्रारंभ केला. काही ठिकाणी मे महिन्यात झालेल्या पावसाच्या पाण्यावरच पेरणीस प्रारंभ केला. जुलै, ऑगस्ट महिन्यात देखील अपेक्षित पाऊस झाला नाही. अशाही परिस्थितीत खरीप पिके तग धरून होते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्य़ात बाजरी काढण्यास प्रारंभ झाला. काही ठिकाणी सोयाबीन, तूर, उडीद काढणीचा लगबग सुरू असतानाच 13 सप्टेंबर पासून पावसाचे जोरदार आगमन झाले. सलग दोन तीन दिवस सुरू असलेल्या पावसाने पाथर्डी, शेवगाव, नगर, श्रीरामपूर, जामखेड, कर्जत, पारनेर आदी तालुक्यात थैमान घालत खरीप पिके,फळबागांची नासाडी केली. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले.
13 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी 281.5 मिलिमीटर पावसाची नोंद होती. यंदा सरासरी 448.1 मिलिमीटर इतका पाऊस जिल्ह्यात होईल की नाही अशी शक्यता असतानाच पावसाने पुन्हा जोरदार आगमन केले. दोन तीन दिवस सुरु असलेल्या या सर्वदूर पावसाने हाहाकार उडवून दिला. खरीप पिके, फळबागांचे जवळपास सव्वातीन लाख हेक्टर नुकसान झाले आहे.
त्यानंतर शनिवारी आणि रविवारी रेकॉर्ड ब्रेक 81.8 मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाचा फटका राहाता तालुक्यासह नऊ तालुक्यांना बसला आहे. राहाता तालुक्यात एकाच दिवशी 150 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या सव्वातीन महिन्यात फक्त सरासरी 281.5 मिलिमीटर पाऊस झाला. मात्र, गेल्या 15 दिवसांत झालेल्या 306.6 मिलिमीटर पावसाने जिल्ह्याची दाणादाण उडवून दिली.
पाथर्डी तालुक्यात 13 सप्टेंबर रोजी 363.3 मिलिमीटर पावसाची नोंद होती. आजमितीस सरासरी 920 मिलिमीटर इतकी झाली आहे. शेवगाव तालुक्यात 359.3 मिलिमीटर पाऊस होता. आज मात्र या तालुक्यात 786.1 मिलिमीटर पाऊस नोंद झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांत कमीत कमी 88.6 ते जास्तीत जास्त 556 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
पंधरा दिवसांतील पाऊस
नगर : 340.3 पारनेर : 279.8 श्रीगोंदा : 279
कर्जत : 348.5 जामखेड : 454.4 शेवगाव : 426.8
पाथर्डी : 556.7 नेवासा : 393.1 राहुरी : 219.3
संगमनेर : 132.8 अकोले : 88.6 कोपरगाव : 208.6
श्रीरामपूर : 298.7 राहाता : 296.1 (मिलिमीटर)
सराला बेटाला गोदेचा वेढा
श्रीरामपूर : तालुक्यातील गोदावरी नदीवरील श्रीक्षेत्र सराला बेट गोदाधाम संपूर्ण बेटास पाण्याचा वेढा पडून वांजरगाव (ता.वैजापूर) बाजूचा जुना पूल पाण्यात असून नवीन पुलाच्या दोन्ही बाजू पाण्यात बुडाल्याने दिवसभर बेटातून येणे-जाण्याचे मार्ग बंद होते. सोमवारी दिवसभर महंत रामगिरी महाराज बेटावरच तळ ठोकून होते. बेटावर विश्वस्त मधुकर महाराजांसह 40 शिष्यगण महाराज, गुरूकुलमध्ये 100 विद्यार्थी, 30 अंध सेवेकरी भक्त, 50 शेतमजुर कामगार, गोशाळेतील 250 गावरान गायी-वासरे असे सर्वजण सुरक्षित सुखरूप आहेत.