Rahuri Statue Vandalism Case Pudhari
अहिल्यानगर

Rahuri Statue Vandalism Case: राहुरीत महापुरुषांच्या मूर्ती विटंबना प्रकरणी १० महिने तरीही आरोपी मोकाट; एसपी घार्गेंसमोर नागरिकांचा संताप

सीसीटीव्हीअभावी तपास रखडला, आरोपींचा तात्काळ छडा लावण्याची जोरदार मागणी

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: शहरात महापुरुषांच्या मुर्तीची विटंबना होऊन, तब्बल दहा महिने उलटले, परंतू आरोपींचा शोध लागला नाही, याबद्दल राहुरीकरांनी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासमोर तीव्र शब्दात खंत व्यक्त केली.

जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी, राहुरी पोलिस स्टेशनला वार्षिक कार्यालयीन आढावा घेण्यासाठी भेट दिली. यावेळी राहुरी व्यापारी असोसिएशन व शहरातील प्रमुख नागरिकांनी त्यांची भेट घेऊन, विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. प्रारंभी राहुरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने घार्गे यांचा सत्कार करण्यात आला. व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रकाश पारख, देवेंद्र लांबे, अनिल कासार, बाळासाहेब उंडे, दीपक मुथा, ॲड. संतोष आळंदे, संजीव उदावंत, सूर्यकांत भुजाडी, नवनीत दरक आदी उपस्थित होते.

राहुरी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले असते तर, आरोपींचा शोध लवकर लागला असता. यामुळे गृहखात्याकडे कॅमेरे बसवण्यासाठी पोलिस प्रशासनाने तत्काळ पत्र पाठवावे. अहिल्यानगर-शिर्डी महामार्गाचे काम सुरू आहे. यामुळे एकेरी वाहतुकीमुळे मोठी कोंडी निर्माण होत आहे. रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. नागरिकांचा वेळ वाया जातो. यामुळे या महामार्गावरील अवजड वाहतूक अन्य मार्गाने वळवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

विटंबना प्रकरणी तीव्र भावना

एकीकडे अपहृत मुलींचा शोध घेण्यास यश मिळत असताना, दुसरीकडे महापुरुषांच्या मुर्तीची विटंबना करणाऱ्या नराधमांचा शोध लावण्यात राहुरी पोलिसांना अद्यापही यश आले नाही. तब्बल दहा महिने उलटूनही आरोपींचा सुगावा लागत नाही. यामुळे राहुरीकर जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहेत. आरोपींचा तत्काळ छडा लावून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या घटनेमुळे राहुरी शहरासह तालुक्यात सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम केले जात आहे, अशा भावना पोलिस अधिक्षक घार्गे यांच्यासमोर व्यक्त करण्यात आल्या.

अपहृत 100 मुलींची घरवापसी!

राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या पथकाने ‌‘ऑपरेशन मुस्कान‌’ अंतर्गत अपहृत 100 मुलींची घरवापसी करून दिली. पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांनी यावेळी विशेष कौतुक केले. कर्तव्यदक्ष अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे अवघड गुन्हे मार्गी लागतात, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

राहुरी तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकल्या आहेत. प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासासह पोलिस बळ वाढविण्याबाबत कार्यवाही करु
सोमनाथ घार्गे, पोलिस अधिक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT