

बोधेगाव: कोपरगाव आगारातील एसटी वाहकाच्या बेजबाबदार वर्तनामुळे एका वृद्ध प्रवाशाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 20 जानेवारी) सकाळी घडली.
कोपरगाव-पैठण या मार्गावरील एसटी बस (क्र. एमएच 40-5998) मधून कोपरगाव येथून वृद्ध दाम्पत्य पैठणमार्गे शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील कोळी वस्तीवरील विवाह सोहळ्यासाठी प्रवास करीत होते. सदर बस शेवगाव बसस्थानकात आल्यानंतर भरत आगळे हे लघुशंकेसाठी खाली उतरले. मात्र, त्याचवेळी वाहकाने बसची बेल दिली. यावेळी बसमध्ये असलेल्या त्यांच्या पत्नीने वाहकास पती लघुशंकेसाठी उतरले असून, येईपर्यंत बस थांबवा, अशी कळकळीची विनंती केली.
मात्र, वाहकाने ही विनंती धुडकावून लावत पुन्हा बेल देत चालकास बस पुढे नेण्यास सांगितले. परिणामी वडिलांना मागे टाकून बस थेट पैठणपर्यंत रवाना झाली. या प्रकारामुळे भरत आगळे यांना बराच वेळ शेवगाव बसस्थानकात थांबावे लागले. नंतर दुसऱ्या बसने प्रवास करून पैठण गाठावे लागले. या संपूर्ण घटनेमुळे त्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला.
या प्रकरणी धनंजय भरत आगळे यांनी एसटी महामंडळाकडे ई-मेलद्वारे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत वाहक व चालकाच्या निष्काळजीपणामुळे एसटी महामंडळाच्या प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी या ब्रीदवाक्याला काळिमा लागल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार संबंधित प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविण्यात येणार असून, ग्राहक म्हणून न्यायालयातही दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एसटी महामंडळाने या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित वाहक व चालकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.