

कैरो : इजिप्तमधील भव्य पिरॅमिड कसे बांधले गेले, हे रहस्य अनेक दशकांपासून संशोधकांना चकित करत असते. आता एका नव्या संशोधनातून एक अतिशय रंचक माहिती समोर आली आहे. संशोधकांच्या मते, पिरॅमिड बांधण्यासाठी पुली (घिरणी) आणि काऊंटरवेट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असावा.
या पद्धतीमुळे प्रचंड वजनाचे दगड वर ओढणे खूप सोपे झाले असावे, ज्यामुळे पिरॅमिड इतक्या कमी वेळात आणि इतक्या मोठ्या उंचीपर्यंत उभारता आले. डॉ. सायमन अँड्रियास श्यूरिंग आणि त्यांच्या पथकाने पिरॅमिडची रचना तसेच दगड घडवण्याच्या पद्धतींचा सखोल अभ्यास केला. इजिप्तचा ग््रेाट पिरॅमिड हा जगातील सर्वात मोठ्या आश्चर्यापैकी एक मानला जातो. या पिरॅमिडच्या बांधकामासाठी सुमारे 23 लाख चुनखडीचे दगड वापरले आहेत. यामधील सर्वात लहान दगडाचे वजन सुमारे 2,000 किलो, तर सर्वात मोठ्या दगडाचे वजन जवळपास 60,000 किलोपेक्षा अधिक होते.
हा पिरॅमिड बांधायला सुमारे 20 वर्षे लागली असावीत. याचा अर्थ असा की, मजुरांनी जवळपास प्रत्येक मिनिटाला एक दगड योग्य जागी बसवला असावा. संशोधकांचे असेही मत आहे की, पिरॅमिडच्या आत उतार असलेले मार्ग तयार केले होते. या मार्गांवर मोठ्या वजनाच्या यंत्रणा म्हणजेच काऊंटरवेटस् बसवलेले होते. जेव्हा एक जड वजन खाली येत असे, तेव्हा पुलीच्या मदतीने ते दुसरा जड दगड वर ओढत असे. ही प्रणाली अगदी आजच्या लिफ्टसारखी काम करत होती. यामुळे मजुरांची ताकद वाचली आणि दगड अत्यंत अचूकतेने मोठ्या उंचीपर्यंत पोहोचवता आले.