राहुरी: नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग म्हणजे आता प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. रखडलेले, अर्धवट व निकृष्ट दर्जाचे रस्ते काम, त्यामुळे सुरू असलेली दुहेरी वाहतूक, ठिकठिकाणी पडलेले खोल खड्डे, अपुरे बॅरिकेड्स आणि दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे हा महामार्ग दररोज अपघातांना आमंत्रण देत आहे. याच महामार्गाने रविवारी (दि. 28 डिसेंबर) आणखी एक निष्पाप बळी घेतला. राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा परिसरात झालेल्या भीषण अपघातात नदीम आदम शेख (वय 19) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला उमर अब्बास शेख गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी महामार्गावर चक्काजाम आंदोलन छेडले. परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
डिग्रस (ता. राहुरी) येथील नदीम आदम शेख व उमर अब्बास शेख हे दोघे रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरून राहुरीहून डिग्रसकडे जात होते. डिग्रस फाटा परिसरात रस्ता अर्धवट खोदलेला, खड्ड्यांनी भरलेला असून, तेथे कुठलाही इशारा फलक नाही. तेथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत नदीम शेख यांच्या डोक्याला मार लागला. नदीम यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. जखमी उमर शेख याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
चक्काजामुळे महामार्ग दोन तास ठप्प
या दुर्घटनेनंतर मृत नदीम शेख यांच्या नातेवाइकांचा संताप अनावर झाला. सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास त्यांनी डिग्रस फाटा येथे महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू केले. रस्त्याचे काम पूर्ण होत नाही आणि अपघात थांबत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. रुग्णवाहिका, मालवाहू वाहने आणि प्रवासी वाहने त्यात अडकून पडली. सुमारे दोन तास महामार्ग पूर्णतः ठप्प होता.
महामार्ग की मृत्यूचा सापळा?
महामार्गावरील परिस्थिती अत्यंत भयावह बनली आहे. रस्त्यावर उडणारी धूळ, रात्री अपुरा प्रकाश, कोणताही सिग्नल किंवा फलक नसणे, अचानक वळणे, उघडी खोदकामे आणि बिनधास्त धावणारी अवजड वाहने यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शाळकरी मुले, महिला, वृद्ध, रुग्णवाहिका व एसटी बसचालकांनाही या महामार्गावरून प्रवास करताना भीती वाटत आहे. मात्र या गंभीर परिस्थितीकडे बांधकाम विभाग आणि पोलिस प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. यावेळी शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी संतप्त भूमिका घेतली. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी ठणकावून सांगितले. अखेर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विनंतीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
...तर 2 जानेवारीला तीव्र आंदोलन: तनपुरे
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तातडीने आंदोलनस्थळी जाऊन संतप्त नातेवाइकांची समजूत काढली. त्यांनी पोलिस प्रशासन व संबंधित ठेकेदारांशी थेट मोबाईलवरून चर्चा करत जाब विचारला. राहुरीकरांचा जीव कवडीमोल नाही. अपघात होत असताना अधिकारी कार्यालयात शांत झोपलेले आहेत. ठेकेदारांना मोकळे रान दिले असून निकृष्ट कामावर कुणाचेही नियंत्रण नाही, असा संतप्त सवाल तनपुरे यांनी उपस्थित केला. या महामार्गावरील अवजड वाहतूक तत्काळ बंद करावी, धोकादायक ठिकाणी बॅरिकेड्स, दिवे व फलक लावावेत आणि रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली. प्रशासनाने तत्काळ दखल घेतली नाही, तर येत्या 2 जानेवारी रोजी महामार्गावर तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.