रियाज देशमुख
राहुरी नगरपरिषदेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अरुण तनपुरे यांनी रावसाहेब चाचा तनपुरे यांना सोबत घेतल्याने तनपुरेंची दिलजमाई झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे महायुतीतील शिंदे सेनेने बाहेर पडत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. राहुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व सभापती अरुण तनपुरे यांच्या जनसेवा मंडळाला कोंडीत पकडण्यासाठी भाजपने यंत्रणा राबवली. त्यामुळे तनपुरे गटाने सावध भूमिका घेत रावसाहेब चाचा तनपुरे यांचा गटही सोबत घेत भक्कम आघाडी तयारी केली. तर प्रस्थापितांना शह देण्याचे ध्येय आखत शिंदे गट व वंचित बहुजन आघाडीने नगराध्यक्ष पदासह काही प्रभागांत आपले दावेदार उभे करत निवडणुकीत रंगत आणली आहे.
तनपुरेंचा भाऊसाहेब मोरेंवर विश्वास
राहुरी नगरपरिषद कार्यालयामध्ये अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी दिसून आली. सकाळीच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे, सभापती अरुण तनपुरे व युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या मार्गदर्शनात शिक्षक म्हणून ओळख असणारे भाऊसाहेब मोरे यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करण्यात आला.
भाजपकडून चाचा समर्थक सुनील पवार मैदानात
रावसाहेब चाचा तनपुरे यांचे समर्थक समजले जाणारे सुनील पवार यांनी चाचाला सोडून देत, थेट भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपाकडून सुनील पवार हेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असल्याचे आता लपून राहिलेले नाही. आता चाचा तनपुरे हे आपलाच असलेल्या सुनील पवारला चितपट करण्यासाठी डावपेच आखणार असल्याचे चित्र आहे.
भाऊसाहेब माळी वंचितचे उमेदवार
वंचित बहुजन आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी बापूसाहेब भाऊसाहेब माळी यांना उमेदवारी घोषित केली आहे. नगरसेवक पदासाठी 5 जणांना वंचितने उमेदवारी दिल्याची माहिती वंचितचे एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव, तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, संपर्कप्रमुख पिंटूनाना साळवे यांनी दिली.
प्राजक्त तनपुरे, अरुण तनपुरेसह चाचाही एकत्र
तनपुरेंकडून नगराध्यक्ष पदासाठी भाऊसाहेब मोरे
विखे-कर्डिले पॅनलकडून सुनील पवार उमेदवार
महायुतीतून शिंदे शिवसेना बाहेर; मासरे मैदानात
शिंदे शिवसेनेकडून ईश्वर मासरे रिंगणार
शिदे सेनेच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी ईश्वर नारायण मासरे यांसह नगरसेवक पदासाठी 14 असे एकूण 15 उमेदवार शिंदे सेनेकडून रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे तनपुरे गटाच्या जनसेवा विरोधात भाजपची थेट लढाईमध्ये शिंदे सेना व वंचितची लढाई निर्णायक ठरू शकते.
बंडखोरांचे बंड शमणार का?
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व रावसाहेब चाचा तनपुरे हे एकत्र आल्याने इच्छुक जास्त झाले होते. त्यामुळे उमेदवारी देताना श्रेष्ठींची कसरत झाली.. त्यामुळे निवडणुकीत उत्कंठा तयार झाली आहे. भाजपकडेही उमेदवारांची अधिक संख्या पाहता बंडखोरांची डोकेदुखी होणार की वरिष्ठ राजकीय नेत्यांमार्फत बंड शमणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.