राहुरी: निवडणूक विभागाने अर्ज सादर करण्यात ऑनलाईनच्या किचकट अटी दूर करताच, ऑफलाईन प्रक्रियेने अर्ज सादर करणाऱ्यांच्या संख्येत कमालिची वाढ झाली आहे. काल रविवारी (दि.16) रोजी नगराध्यक्षपदासाठी 3 तर, नगरसेवकपदासाठी 18 अर्ज दाखल झाले. 4 इच्छूक नगराध्यक्षासाठी तर, 28 इच्छूक नगरसेवकपदासाठी रणांगणात उतरले आहेत. दरम्यान, आज सोमवारी (दि.17 नोव्हेंबर) शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राहुरी नगरपरिषदेसाठी 12 प्रभागातून 24 नगरसेवक, तर लोकनियुक्त नगराध्यक्ष असे 25 कारभारी नेमण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव, सहाय्यक नामदेव पाटील व अभिजित हराळ यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज दाखल प्रक्रिया पार पडत आहे. शनिवार- रविवार या दोन्ही दिवसांच्या सुट्ट्या रद्द करताच, पालिका निवडणुकीत इच्छूकांची भाऊगर्दी दाटली. शनिवारी नगराध्यक्षपदासाठी 1 तर, नगरसेवक पदासाठी 10 जणांनी अर्ज दाखल केला होता. रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक विभागात इच्छूक उमेदवारांची धावपळ दिसली. नगराध्यक्षपदासाठी 3 तर, नगरसेवक पदासाठी 18 अर्ज दाखल झाले. आज सोमवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे.
राहुरी शहरात मतदारांचे चोचले पुरविण्यासाठी इच्छूक उमेदवारांची दमछाक होत आहे. नगरपरिषद हद्दीमध्ये सत्ताधारी तनपुरे गट विरोधात भाजप, शिंदे सेना व वंचितसह इतर समविचारी पक्षांचे नियोजन सुरू आहे. रावसाहेब (चाचा) तनपुरे यांच्या विकास मंडळाची तनपुरे गटाशी बोलणी अजूनही सुरूच असल्याचे दिसत आहे. यामुळे राहुरी नगरपरिषदेची निवडणूक दुरंगी, तिरंगी की, चौरंगी होणार याबाबत वेगवेगळे तर्क- वितर्क लावले जात आहेत. भाजप पक्षाचे निर्णय सर्वेसर्वा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व युवा नेते अक्षय कर्डिले हेच घेणार आहेत. मागिल सत्ताधारी तनपुरे गटाकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. वंचित बहुजन इच्छूकांच्या मुलाखती घेत आहे. यामुळे राहुरी नगरपरिषद निवडणुकीमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह नगरसेवक होण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुकांची घोडदौड राजकीय नेत्यांच्या दारी सुरू आहे.
नगरसेवकपदासाठी प्रभाग क्र. 2 बमध्ये दीपक एकनाथ तनपुरे, प्रभाग क्र. 4 अ मध्ये संदीप किसनराव रासकर, हेमंत सोपान गिरमे, किशोर सुधाकर राऊत, प्रभाग क्र.5 अमध्ये रेणूका सचिन काशिद, प्रभाग 6 बमध्ये प्रकाश बन्सीलाल पारख, प्रभाग क्र. 7 अमध्ये ज्ञानेश्वर भिमराज जगधने, सोन्याबापू वसंतराव जगधने व प्रभाग 7 बमध्ये पूनम गंगाराम उंडे यांचे दोन अर्ज दाखल झाले. प्रभाग 8 अमध्ये डॉ. अंगराज पवार, जालिंदर वामन बर्डे, गोपीनाथ गोरक्षनाथ मेढे, प्रभाग 10 अमध्ये मंजुषा दीपक रकटे, 10 बमध्ये दिनेश लुमाजी उंडे, प्रभाग 12 बमध्ये अलमास अफनान आतार, आरजू रियाज शेख, अल्फिया अब्दूल सत्तार शेख यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
नगराध्यक्षपदासाठी दाखल अर्ज
नगराध्यक्षपदासाठी डॉ. अंगराज हरिभाऊ पवार यांनी एक अपक्ष, तर दुसरा विकास आघाडीकडून अर्ज सादर केला. नामदेव बंडू पवार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. दोन्ही पवारांचे 3 अर्ज दाखल झाले. यापूर्वी सखाहरी शांताराम बर्डे यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल आहे.