राहुरी: तालुक्यातील देसवंडी येथील एका मोबाईल टॉवरवर चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल 75 हजार रुपयांच्या बॅटऱ्या लंपास केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संतोष रामभाऊ साळवे (वय 40, रा. आगाशेनगर, श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. साळवे हे रिलायन्स जिओ टेलिकॉममध्ये मागील तीन वर्षांपासून सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. दि. 17 एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे दिड वाजेच्या सुमारास टेक्निशियन गणेश बानकर यांनी साळवे यांना फोन करून देसवंडी येथील जिओ टॉवर बंद पडल्याची माहिती दिली.
सकाळी साळवे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, टॉवरमधील ओ.डी.सी. रॅकमधून बॅटऱ्या चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनी कॉसलाईट 100 एएच कंपनीच्या प्रत्येकी सुमारे 15 हजार रुपये किमतीच्या पाच बॅटऱ्या चोरून नेल्या असून एकूण 75 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. चोरी गेलेल्या बॅटऱ्यांचे सिरीयल क्रमांक पोलिसांना देण्यात आले असून त्याआधारे तपास सुरू आहे. पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, देसवंडी येथील टॉवरच्या बॅटरी चोरी गेल्याची घटना समजताच पोलिस प्रशासनाने दखल घेतली आहे. सीसीटीव्हीची तपासणी तसेच संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाची माहिती घेत तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली.
तीन दिवस रेंज गायब
टॉवरच्या बॅटरी चोरी झाल्यानंतर मोबाईलची रेंज गायब झाली होती. रेंज नसल्याने ग्रामस्थांना पर्यायी मार्गाचा वापर करून इतर कंपन्यांच्या सिमकार्ड खरेदी करून रिचार्जचा अतिरिक्त भार सोसावा लागला. 3 दिवसानंतर बॅटरी बसविल्यानंतर रेंज पुन्हा सुरळीत झाल्याचे सरपंच योगिता कल्हापुरे यांनी सांगितले.