

नगर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आज रविवारी (दि.26) चौथी (प्राथमिक शिष्यवृत्ती) आणि सातवी (उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती) परीक्षा होत आहे. नगर जिल्ह्यात 541 परीक्षा केंद्रांवर 1 लाख 23 हजार 262 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात असून शिक्षण विभागाने आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली आहे.
शासनाच्या बदलत्या धोरणानुसार यावर्षीपासून पहिल्यांदाच इयत्ता चौथी आणि सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण अधिकारी भास्कर पाटील तसेच उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे यांनी परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. विविध चाचण्या आणि सराव परीक्षांच्या माध्यमातून प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करून घेण्यात आली असून त्यामुळे चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत उत्सुकता आणि आत्मविश्वास वाढल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात चौथीच्या 344 केंद्रांवर 8024 शाळांमधील 98 हजार 378 विद्यार्थी, तर सातवीच्या 197 केंद्रांवर 1495 शाळांमधील 24 हजार 884 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी संख्या असून प्रशासनाने सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.