राहुरी: गेल्या आठ ते दहा वर्षांपासून घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप करत तालुक्यातील मोमीन आखाडा येथील एका लाभार्थ्यांनी थेट ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले आहे. वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने संतप्त झालेल्या लाभार्थ्यांनी जोपर्यंत आपल्या तक्रारीची चौकशी होऊन न्याय मिळत नाही, तोपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामकाजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लाभार्थ्याने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे दिलेल्या लेखी तक्रारीत घरकुल योजनेच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून घरकुल मिळवून देण्याबाबत टाळाटाळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. सन २०१६-१७ मधील ऑनलाइन प्रिंट व लाभार्थ्यांची माहिती, मंजूर झालेल्या घरकुलांची संख्या, अपूर्ण राहिलेली कामे तसेच सन २०२१-२२ पर्यंतच्या संपूर्ण कामकाजाची पडताळणी करावी, अशी मागणी तक्रारीत केली आहे.
घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळाला आहे का, मंजूर घरकुले पूर्ण झाली आहेत का आणि ग्रामपंचायत स्तरावर योजनेची अंमलबजावणी नियमानुसार झाली आहे का, याची तपासणीची मागणी त्यांनी केली आहे.
यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदने देऊन तक्रारी मांडल्या; मात्र अद्याप न्याय मिळाला नसल्याचा दावा कोळपे यांनी केला आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. आता या तक्रारीची पंचायत समिती प्रशासन कितपत गांभीर्याने दखल घेते आणि घरकुल योजनेतील कथित अनियमिततेची चौकशी कधी सुरू होते, याकडे मोमीन आखाडा ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
दोषीवर नियमानुसार कारवाई करावी
मोमीन आखाडा ग्रामपंचायतीच्या घरकुल योजनेतील अनियमिततेची सखोल चौकशी करून दोषीवर नियमानुसार कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे. तक्रारीची चौकशी होऊन न्याय मिळेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप उघडू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तसेच भविष्यात आपल्या जीवितास काही धोका निर्माण झाल्यास त्याला ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील, असेही तक्रारीत नमूद केले आहे.