नगर: शिक्षणाचे धडे गिरवतात एका शाळेत आणि दाखले मात्र भलतीकडेच. शिक्षकांची अतिरिक्त पदे वाचविण्यासाठी बोगस पटसंख्येचा कथित खेळ राहुरी तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकाराने शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, संबंधित आठ शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षक प्रशासनाच्या रडारवर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामागे शिक्षक नातेवाईकांची साखळी असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये संचमान्यतेसाठी विद्यार्थी पटसंख्या महत्त्वाची असते. पटसंख्या कमी झाल्यास शिक्षकांचे पद अतिरिक्त ठरू शकते. राहुरी तालुक्यातील संबंधित शाळेत मुख्याध्यापकांसह सहा शिक्षकांची पदे असून, पटसंख्या सुमारे शंभर आहे. गत वर्षी एका शिक्षकाचे पद कमी होण्याची शक्यता असल्याने येथे बोगस विद्यार्थी असल्याची तक्रार दोघा स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी शिक्षण विभागाकडे केली होती. तक्रारीची प्रत विभागीय आयुक्तांपर्यंतही पोहोचली. मात्र, तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात कारवाई झाली नसल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे. संबंधित अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर तक्रारदारांनी पुन्हा पाठपुरावा केल्याने चौकशीला गती मिळाली.
या शाळेतील काही शिक्षकांच्या पत्नी व नातेवाईक कार्यरत असल्याचेही तपासणीत समोर आले. त्यांची पदे वाचविण्यासाठी इतर शाळांतील शिक्षक नातेवाईकांनी विद्यार्थ्यांचे दाखले दिल्याचा संशय आहे. एक विद्यार्थी कायम गैरहजर असतानाही त्याचा दाखला संबंधित शाळेत पाठवला असल्याचेही समजते. सर्व प्रकरणात संबंधित आठ शाळांचे मुख्याध्यापक प्रशासनाच्या रडारवर आहेत. तर वेळेवर शाळेत न येणे व इतर कारणांनी काही शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाऊ शकते असेही सूत्रांकडून समजते.
हजेरी पुस्तकात खाडाखोड अन् पानांचीही चिकटाचिकटी
चौकशीदरम्यान शिक्षण विभागाचे अधिकारी संबंधित शाळेवर धडकले. दप्तर तपासणीत विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन वह्यांमध्ये पटावरील ११ ते १४ विद्यार्थ्यांची नावे नसल्याचे आढळले. हजेरी पुस्तकात खाडाखोड, काही पाने चिकटविल्याचेही निदर्शनास आले. त्यानंतर प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मूळ शाळांमध्ये जाऊन परीक्षेचे पेपर तपासले. संबंधित विद्यार्थी मूळ शाळेतच परीक्षा देत असल्याचे पुरावे मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे दाखले एका शाळेत आणि परीक्षा दुसऱ्या शाळेत, असा विरोधाभास समोर आला. संबंधित विद्यार्थी हे वांबोरी स्टेशन, आंबी, पिंपळगाव फुणगी, मांजरी, गंगापूर परिसरातील जिल्हा परिषद शाळांतील असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.
माहिती अधिकार अर्जातून माहिती मिळवली त्या शाळेत पटसंख्या १४ आहे. बाहेरच्या आठ शाळातून हे विद्यार्थी दाखले आणले आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही मुलगा त्या शाळेत कधी दाखल केला हे माहिती नाही. तीन विद्यार्थ्यांची डबल नोंद आहे. शिक्षण विभागाकडून चौकशी झाली आहे. चौकशी अधिकाऱ्यांना दमबाजी करण्यात आली. राहुरीसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारे बोगस पट संख्येचा खेळ असू शकतो. याची चौकशी होण्याची गरज आहे.अरुण वाबळे, सामाजिक कार्यकर्ते.
त्या शाळेतील पटसंख्या संदर्भात प्राप्त तक्रारींची चौकशी पूर्ण झाली आहे. संबंधित सर्व शाळांवर जाऊन विद्यार्थ्यांची हजेरी, परीक्षा पेपर, दाखल्यांची तपासणी केली. प्रशासन म्हणून याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक स्वयं स्पष्ट अहवाल जिल्हा परिषदेला पाठवला आहे. कारवाई टाळणे किंवा कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.जयश्री कारले, गटशिक्षणाधिकारी, राहुरी