नगर: राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची पूर्वतयारी निवडणूक आयोगाच्या वतीने सुरु झाली आहे. या मतदारसंघात आणखी 67 मतदान केंद्रांची वाढ करण्यात आली असून, या वाढीस भारत निवडणूक आयोगाने मान्यतादेखील दिली आहे. मंगळवारी (दि.6) 3 लाख 31 हजार 364 मतदारसंख्या असलेली प्रारुप मतदारयादी प्रसिध्द होणार आहे.
विधानसभा सदस्य कै. शिवाजी कर्डीले यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या 223-राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 21 नुसार या मतदारसंघासाठी मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला केला.
हा कार्यक्रम 1 जानेवारी 2026 या अर्हता दिनांकाच्या आधारे राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमानुसार मतदारसंघातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण 29 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या मतदारसंघात 307 मतदान केंद्रांची संख्या होती.
बाराशेपेक्षा अधिक मतदारसंख्या मतदान केंद्रांत नसावी यासाठी मतदान केद्रांचे सुसूत्रिकरण करण्यात येऊन नवीन 67 मतदान केंद्र वाढविण्यात आले. त्यानुसार आगामी पोटनिवडणुकीसाठी आता 374 मतदान केंद्र असणार आहेत.
दरम्यान, 6 जानेवारी 2026 रोजी एकात्मिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 6 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा 7 फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार असून, अंतिम मतदारयादी 14 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.