राहुरी: शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवून राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीने कारभार केला आहे. राज्यातील बोटावर मोजता येतील, अशा सक्षम बाजार समित्यांच्या पंक्तीत राहुरी बाजार समितीने स्थान निर्माण केले आहे, असे प्रतिपादन बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी केले. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.२७) उत्साहात पार पडली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना सभापती तनपुरे बोलत होते.
यावेळी सभापती तनपुरे म्हणाले, बाजार समितीने स्वनिधीतून जागा खरेदी करून आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार केला आहे. या जागेवर व्यापारी संकुल उभारण्यात येणार असून त्यातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. राहुरी सूतगिरणीची साडेतेरा एकर जागा खरेदी केली असून या ठिकाणीही बाजार समितीचा विस्तार करण्यात येत आहे. लवकरच येथे कापूस खरेदी सुरू करून जिनिंगचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी करणार आहे. शासकीय कापूस खरेदीचाही लाभ शेतकऱ्यांना मिळेल. राहुरी शहरालगत पावणेतीन एकर जागा तसेच राहुरी सूतगिरणीची साडेतेरा एकर जागा बाजार समितीने खरेदी केली आहे. याशिवाय आणखी ३१ एकर जागा खरेदी करण्याचा मानस असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे सभापती तनपुरे यांनी सांगितले.
सभेस प्रेरणा अर्थ परिवाराचे संस्थापक सुरेश वाबळे, कारखान्याचे संचालक अशोक उर्हे, उपसभापती महेश पानसरे, संचालक दत्तात्रेय कवाणे, बाळासाहेब खुळे, गोरक्षनाथ पवार, शामराव निमसे, रखमाजी जाधव, मधुकर पवार, सुरेश बाफना, दत्तात्रेय शेळके, रामदास बाचकर, चंद्रकांत पानसंबळ, सुभाष डुक्रे, मारुती हारदे, मंगेश गाडे, शारदा आढाव, भाऊसाहेब खेवरे आदी उपस्थित होते.
सचिव भिकादास जरे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. व्यापारी लक्ष्मण गागरे, शेतकरी किशोर जाधव, भाऊसाहेब गुंजाळ, रवींद्र आढाव, विजय माळवदे, सुरेश वाबळे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
१८ कोटीच्या भौतिक सुविधा
संस्थेने कोणतेही कर्ज न घेता स्वनिधीतून राहुरी व वांबोरी आवारात सुमारे १८ कोटी रुपयांच्या भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. राहुरी नगरपरिषदेची पावणेतीन एकर जागा आठ कोटी रुपयांना खरेदी केली असून या ठिकाणी गाळे आणि भाजीपाला बाजार सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती अरुण तनपुरे यांनी दिली.