भाजपचे प्रकाश चित्ते शिवसेनेत दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भगवा झेंडा प्रदान Pudhari
अहिल्यानगर

Prakash Chitte joins Shinde Sena: भाजपचे प्रकाश चित्ते शिवसेनेत दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भगवा झेंडा प्रदान

श्रीरामपूरमध्ये शिंदे गटाला बळ; नगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे पाठबळ

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर : भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचे माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपाला रामराम ठोकत शिवसेनेत अधिकृत प्रवेश करत कमळ सोडून हाती धनुष्यबाण घेतला. मुंबई येथील सेवासदन बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा झेंडा श्री व सौ. चित्ते यांना दिला. तालुका संपर्कप्रमुख जनार्दन गालपगार, सचिव रमेश रेपाळे आदींच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. आगामी निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने लढा, पाठबळ देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्ते यांना दिले.(Latest Ahilyanagar News)

याप्रसंगी माजी नगरसेवक किरण लुणिया अशोकचे माजी संचालक बबन मुठे, संजय पांडे, राजेंद्र कांबळे, शशिकांत कडुसकर, मनोज हिवराळे, संजय यादव, गणेश भिसे, सुरेश आसने, सुरेश सोनावने, अक्षय नागरे, सोमनाथ कदम, सिद्धार्थ साळवे, सोमनाथ पतंगे, बाळसाहेब गाडेकर, अण्णा थोरात, अनिल बोडखे, नारायण पिंजारी, सुहास बंगाळ, दर्शन चव्हाण, संजय राऊत, बाबूराव सुडके, सतीश शेळके, रमेश शिनगारे, तुषार बोबडे, शेखर आहेर, विशाल जाधव यासह मोठ्या प्रमाणात कार्यकते उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रकाश चित्ते यांनी पक्षाचा आदेश असताना महायुतीचे उमेदवार लहू कानडे यांचा प्रचार न करता भाऊसाहेब कांबळे यांचा प्रचार करून पक्षाच्या आदेशाचा भंग केला म्हणून त्यांना विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षातून काढून टाकले होते. श्रीरामपूर तालुक्यात भारतीय जनता पक्षासाठी गेली 35 वर्षे प्रतिकूल परिस्थितीतही झटत काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर पक्षाने अन्याय केल्याची भावना तेव्हा व्यक्त झाली होती.

तरीही भाजपाबद्दल असलेली निष्ठा कायम ठेवत ते पक्षाचे काम करत राहिले. आगामी नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांनी मागणी केली होती; मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेवटी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाची वेळ निश्चित केली आणि रविवारी (दि. 19) त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

श्रीरामपूर आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटात भानुदास मुरकुटे, सागर बेग, भाऊसाहेब कांबळे यांनी प्रवेश केला होता. आता रविवारी प्रकाश चित्ते यांच्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचा स्वतंत्र पॅनल

माजी आमदार भानुदास मुरकुटे व भाऊसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूरमध्ये शिंदे गट स्वतंत्र पॅनल उभे करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेत नगराध्यक्ष पदासाठी चित्ते यांचे नाव घेतले जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकावण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी उभे राहण्याचे आश्वासन दिल्याचे चित्ते यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT