Crop Pudhari
अहिल्यानगर

Pohegaon Rain Deficit: पोहेगाव परिसरात पावसाने ओढ दिली; खरीप पिके कोमेजली, बळीराजा चिंतेत

सोयाबीन, मका, कापूस आणि भाजीपाला पिकांना फटका; विहिरीत पाणी असूनही कमी दाबाच्या विजेमुळे सिंचनात अडथळे

पुढारी वृत्तसेवा

पोहेगाव: पोहेगाव परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिके कोमेजली असून आगामी काही दिवसांत पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, कापूस तसेच विविध भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र पावसाने दीर्घकाळ उघडीप दिल्याने सोयाबीनचे पीक कोमजून गेले असून त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. जनावरांसाठी चारा तसेच धान्याचे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांचा मक्याकडे मोठा आधार असतो. मात्र पाण्याअभावी मक्याची वाढ खुंटली असून पिकाची अपेक्षित वाढ होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कापूस व भाजीपाला पिकांवरही पाणीटंचाईचा परिणाम जाणवू लागला आहे.

पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी विहिरीतील उपलब्ध पाण्याचा वापर करून पिकांना पाणी देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र महावितरणकडून मिळणारी वीजही शेतकऱ्यांसाठी अडथळा ठरत आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होणे, तसेच विजेचा भार वाढल्याने विद्युत पंप सुरू होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहेत. त्यामुळे विहिरीत पाणी उपलब्ध असूनही ते पिकांपर्यंत पोहोचविण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

पावसाने आणखी काही दिवस पाठ फिरविल्यास खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणींकडे तातडीने लक्ष द्यावे, तसेच वीजपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत

सोनेवाडी, पोहेगाव, चांदेकसारे, घारी, डाऊच, देर्डे, कोऱ्हाळे, देर्डे चांदवड परिसरातही पावसाअभावी पिकांची अशीच अवस्था झाली असून बळीराजा आभाळाकडे डोळे लावून पावसाची प्रतिक्षा करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT