

नगर तालुका: पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले तरी नगर तालुक्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडला असून त्याची झळ थेट पशुधनालाही बसू लागली आहे. डोंगररांगांमध्येही चारा उपलब्ध नाही अन् चारा पिकांची दयनीय अवस्था झाली आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून चारा डेपो सुरू करण्याची मागणी शरद तोडमल यांनी केली आहे.
पावसाअभावी चारा पिकांची वाढ झालेली नाही. खरीप हंगामातील पिकांचीही पाण्याअभावी दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतातून जनावरांना चारा मिळण्याची आशा मावळली असून बाहेरून चारा खरेदी करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. चा-याअभावी पशुधन जगविणे कठीण झाले आहे. पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील सर्वच तलाव, बंधारे आणि जलसाठे कोरडेठाक पडले आहेत. भूजल पातळीत वाढ न झाल्याने अनेक गावांमध्ये अद्यापही पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या कायम आहे. अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना जनावरांसाठी पाणी आणि चारा कुठून आणायचा हा प्रश्न पशुपालकांना सतावत आहे. पशुधन हेच अनेक शेतकरी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. चारा-पाण्याअभावी जनावरे जगविण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. पावसाळ्यातच अशी विदारक परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील काळाबाबत शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पाऊस न झाल्यास चारा टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तालुक्यात तातडीने चारा डेपो सुरू करावा आणि पशुपालकांना चारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शरद तोडमल यांच्यासह तालुक्यातील पशुपालकांकडून करण्यात येत आहे.
आमदार अक्षय कर्डिले यांची घेणार भेट!
तालुक्यात चारा डेपो सुरू करण्यासाठी आ. अक्षय कर्डिले यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती शरद तोडमल, गोरख तोडमल, प्रणव पवार व प्रमोद पवार यांनी दिली. सध्याची दुष्काळी परिस्थिती, चारा-पाणी टंचाई तसेच पशुपालकांच्या अडचणींमुळे चारा डेपो सुरू करण्यासाठी तसेच पशुधन वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आमदार अक्षय कर्डिले यांच्याकडे करण्यात येणार आहे.
पाऊस नाही शेतात चारा नाही आणि जलसाठेही कोरडे आहेत. अशा परिस्थितीत पशुधन जगवायचे कसे हा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. चारा डेपो सुरू करून पशुपालकांना दिलासा द्यावा.
प्रणव पवार, पशुपालक