Pathardi Drought Like Situation: पाथर्डीत दुष्काळसदृश संकटाची तीव्रता वाढली; चारा-पाण्याअभावी शेतकऱ्यांनी जनावरे विकण्यास सुरुवात

पिके करपली, दूध उत्पादन घटले; ५० हजारांची गाय २० हजारांना विकण्याची वेळ, टोमॅटोला केवळ २ ते ३ रुपये किलो भाव
Cow
CowPudhari
Published on
Updated on

पाथर्डी: पावसाने दडी मारल्याने तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. आता त्याचा फटका पिकांसोबतच पशुधनालाही बसू लागला आहे. पावसाअभावी जिरायती शेतीतील पिके करपली असून, पिके वाचविण्याची आशा मावळल्यानंतर आता जनावरे जगविण्याचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.

Cow
Ahilyanagar African Sugar: अहिल्यानगरच्या किराणा दुकानांत ‘आफ्रिकन साखरे’ची चर्चा; जाड दाण्यांची साखर पाहून ग्राहक बुचकळ्यात

उडीद, बाजरी, हौरी, मूग, सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांना पावसाअभावी मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी पिके करपली असून, काही ठिकाणी संपूर्ण पिके नष्ट झाली आहेत. डोळ्यांसमोर उभे पीक जळून गेल्याचे चित्र पाहून शेतकऱ्यांच्या भावनाही अनावर होत आहेत. तालुक्यातील बहुतांश शेती जिरायती असून, पावसाने पाठ फिरवल्याने संपूर्ण तालुका हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र बिघडले आहे. शेतमजुरांनाही रोजगाराला मुकावे लागत आहे. दुसरीकडे जनावरांसाठी चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

Cow
Ahilyanagar District Bank Election: लोणीतून जिल्हा बँकेचे नवे राजकीय समीकरण? विखेंच्या निवासस्थानी महायुतीच्या दिग्गजांची मांदियाळी

चेकेवाडी येथील शेतकरी दादासाहेब चेके यांनी जनावरांना चारा-पाणी उपलब्ध होत नसल्याने ५० हजार रुपये किमतीची गाय अवघ्या २० हजार रुपयांना विकावी लागल्याची व्यथा ‘पुढारी’कडे मांडली. उसाचा चारा तब्बल पाच हजार रुपये टन दराने मिळत असल्याने जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. अनेक गावांमधील पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. नळाला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. काही ठिकाणी दूषित पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यातून आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सुमारे पाच हजार लिटर पाण्याच्या टँकरसाठी अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत.

Cow
Fodder Shortage: पावसाअभावी नगर तालुक्यात चारा टंचाईचे संकट; पशुधन जगविणे कठीण

चेकेवाडीचे सरपंच बाळासाहेब जिवडे, शेतकरी जालिंदर चेके, दादासाहेब चेके, भिमराज वाघ, बाबासाहेब औटी, आबाचे चेके, संजय जिवडे, आजिनाथ जिवडे तसेच धनगरवाडी येथील शेतकरी शिवाजी पवार, भानुदास कोठे, अर्जुन चितळे, संभाजी पवार, मुक्ता पवार यांच्यासह अशोक गाडे, मिठू चितळे, आदिनाथ पवार, बाजीराव गाडे, दशरथ पवार, तात्या भाऊ भरगुडे, साहेबराव पवार, काशिनाथ चितळे, यमराज चितळे, बन्सी गाडे, कारभारी चितळे, गोरक्ष चितळे, केशव चितळे, रामदास पवार, नरहरी चितळे आदी शेतकऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची एकमुखी मागणी केली आहे.

Cow
Sangamner Rain Deficit Kharif Crops: पावसाने पाठ फिरवताच संगमनेर-श्रीरामपूरमध्ये खरीप संकटात; सुकणारी पिके वाचवण्यासाठी आवर्तनाची मागणी

जनावरे विक्रीला सुरुवात

माणिकदौंडी घाट परिसरातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात जिरायती शेती आहे. या भागातील अनेक शेतकरी दूध उत्पादनासह खवा निर्मितीच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र, जनावरांना पुरेसा चारा व पाणी मिळत नसल्याने दूध उत्पादनावरही परिणाम झाला आहे. जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या पेंडीच्या ५० किलोच्या गोणीचा दर सुमारे अडीच हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने पशुधन सांभाळणे कठीण झाले आहे. चारा, पाणी आणि खाद्यपेंडीच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांचे पशुधनाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. जनावरे सांभाळणे परवडत नसल्याने काही शेतकऱ्यांनी पशुधन विकण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम दूध उत्पादनावर होत असून, खवा निर्मितीसाठी लागणाऱ्या दुधाच्या दरातही वाढ झाली आहे. चारा, पाणी आणि खाद्यपेंडीच्या दरवाढीमुळे खव्याच्या दरात किलोमागे सुमारे ३० ते ४० रुपयांची वाढ झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

टोमॅटोत सोडली जनावरे

सध्या टोमॅटोला व्यापाऱ्यांकडून केवळ दोन ते तीन रुपये किलो दर मिळत आहे. धनगरवाडी येथील शेतकरी शिवाजी पवार यांनी त्यांच्या सुमारे एक एकर टोमॅटोच्या पिकात जनावरे सोडली आहेत. एकीकडे पावसाची प्रतीक्षा, दुसरीकडे रानडुकरांचा धुमाकूळ आणि पिकांना मिळत नसलेला भाव, अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. माणिकदौंडी परिसरात रानडुकरांकडून उभ्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news