पाथर्डी: तालुक्यातील तिसगाव-शेवगाव मार्गावर ट्रक अडवून ट्रकचालकावर दगडफेक करून मारहाणीची घटना घडली असून, या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात जीपमधील चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शुभम सुनीलकुमार गाडे (वय 23, वाहनचालक, रा. येवलेवाडी, ता. हवेली, जि. पुणे) हे 2 जानेवारी रोजी चाकण एमआयडीसीतून कंपनीचे साहित्य भरून ट्रकने (एमएच 12 टीव्ही 8951) झारखंडमध्ये जमशेदपूरकडे जात होते. तिसगाव (ता. पाथर्डी) येथील शेवगाव चौक परिसरात पाठीमागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या आलिशान जीपने (एमएच 14 जीएन 3624) ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.
समोरून वाहन आल्याने तो फसला आणि पुढे पुन्हा जीपने ओव्हरटेक करून ट्रक थांबविला. जीपमधून आलेल्या तीन ते चार इसमांनी ट्रकचालकास शिवीगाळ करत दगडफेक केली. ट्रकच्या समोरील काच ़फुटून ट्रकचालकाच्या डोळ्याला इजा झाली. इतरांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
जिवाच्या भीतीने ट्रकचालकाने ट्रक शेवगावच्या दिशेने निघून जात डायल 112 वर पोलिस मदत मागितली. मात्र, जीपनेे अमरापूर चौकात पुन्हा ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला. तेथे एकाने स्वतःला ‘गोरक्षक’ असल्याचे सांगत ट्रकमध्ये जनावरे असल्याचा आरोप करीत ट्रकला लटकून चढण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
ट्रकचालक थेट पाथर्डी पोलिस ठाण्याकडे गेला. खेर्डे फाटा परिसरात पोलिस मदतीसाठी आले व ट्रक सुरक्षितपणे पाथर्डी पोलिस ठाण्यात आणला. मात्र घटनेच्या धक्क्यामुळे त्या दिवशी तक्रार न देता, चालकाने दुसऱ्या दिवशी फिर्याद दाखल केली.