पाथर्डी: पाथर्डी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची घरपट्टी, नळपट्टी, थकबाकी नसलेला दाखला, तसेच शौचालय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पालिका कार्यालयात अक्षरशः झुंबड उडाली. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर तांत्रिक अडथळे निर्माण झाल्याने आणि ती उशिरा सुरू झाल्यामुळे उमेदवारांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागले. यामुळे पालिका परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. (Latest Ahilyanagar News)
पहिल्याच दिवशी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही, ही बाब लक्षवेधी ठरली. अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार (दि. १०) पासून सुरू झाली असून, पहिल्या दिवशी अर्ज भरण्याऐवजी उमेदवार कागदपत्रे तयार करण्यातच गुंतले होते. निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे ८० अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सध्या घरपट्टी, नळपट्टी आणि थकबाकी दाखल्यांचे काम जुनी पालिका इमारत येथे सुरू असून, अर्ज स्वीकारण्याचे कामकाज नव्या इमारतीत चालू आहे.
उमेदवारांची दमछाक
या निवडणुकीसाठी उमेदवारांना सादर करावयाची सुमारे २७ प्रकारची कागदपत्रे यादीत नमूद करण्यात आली आहेत. अशा अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करताना उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी अक्षरशः हैराण झाले. अपक्ष उमेदवाराला पाच सूचक, तर मान्यता प्राप्त राजकीय पक्षाला एक सूचक आवश्यक आहेत.
अतिरिक्त काऊंटर सुरू करावे
वेबसाईटवरील अडचणींमुळे घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याच्या पावत्या देण्याचे काम संथ गतीने सुरू होते. त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी अतिरिक्त काऊंटर सुरू करण्याची मागणी केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार उद्धव नाईक, तसेच मुख्याधिकारी सपना वसावा यांनी संपूर्ण कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी काटेकोर नियोजन केले आहे. त्यांनी उमेदवारांना आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या आहेत.
उमेदवारांत संभ्रम
स्थानिक पातळीवर निवडणुकीबाबत उत्साहाचे वातावरण असले तरी पहिल्याच दिवशीच्या कागदपत्रीय गोंधळामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पुढील काही दिवसांत अर्ज दाखल प्रक्रियेला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.