पाथर्डी: दरोड्याच्या गुन्ह्यात जप्त केलेली स्कार्पिओ शहरातील जुन्या पोलिस ठाण्याच्या आवारातून चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने तपासात अडथळे निर्माण झाल्याचे समजते.
सहाय्यक फौजदार देवीदास खैरे यांनी तक्रार दाखल केली आहे. 1 नोव्हेंबर 2025 रोजी खांडगाव शिवारात नाथभक्तांवरील लुटीचा गुन्हा घडला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिस उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांनी आरोपी शंकर चांगदेव वांढेकर याच्या ताब्यातून स्कार्पिओ (एमएच 16 डीएस 1070) ही जप्त केली होती. जप्त स्कॉर्पिओला नंबर प्लेट नव्हती. ही स्कॉर्पिओ अहिल्यानगर रोडवरील जुन्या पोलिस ठाण्याच्या आवारात उभी होती.
दरम्यान, नवनी पोलिस ठाण्यातून जुन्या पोलिस ठाण्यातील साहित्य हलविण्याचे काम सुरू असताना 15 ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत स्कार्पिओ पोलिस ठाण्याच्या आवारातून चोरीस गेल्याचे समोर आले. या प्रकारामुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली असून सहाय्यक फौजदार रावसाहेब राठोड या घटनेचा तपास करीत आहेत.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
जुन्या पोलिस ठाण्याच्या आवारात विविध गुन्ह्यांतील जप्त वाहने तसेच अपघातग्रस्त वाहने उभी आहेत. मात्र तेथील फिरता कॅमेरा बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चोरी नेमकी कोणी केली, याचा तपास करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. पोलिस ठाण्याच्या आवारातूनच जप्त वाहनाची चोरी झाल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.
जुन्या ठिकाणी तातडीने नवीन कॅमेरा बसविण्यात येणार असून अतिरिक्त कॅमेऱ्याचीही व्यवस्था करण्यात येईल. सुरक्षा अधिक कडक करण्यात येईल.विलास पुजारी, पोलिस निरीक्षक