Pathardi Police Colony Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Police Colony: पाथर्डीतील २३.८१ कोटींची पोलिस वसाहत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; कर्मचारी अजूनही भाड्याच्या घरात

काम पूर्ण होऊन आठ महिने उलटले; ४८ निवासस्थाने वापराविना पडून, जुन्या वसाहतीच्या दुरवस्थेमुळे पोलिसांसमोर निवासाचा प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

अमोल कांकरिया

पाथर्डी: शहरात राज्य गृहनिर्माण व कल्याण मंडळामार्फत २३ कोटी ८१ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेली अत्याधुनिक पोलिस ठाणे व पोलिस कर्मचारी वसाहतीची इमारत गेल्या आठ महिन्यांपासून उद् घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. इमारतीचे काम पूर्ण होऊनही पोलिसांना अद्याप निवासासाठी घरे उपलब्ध झाली नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना आजही भाड्याच्या घरांमध्ये राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याची चर्चा आहे.

नवीन संकुलात पोलिस ठाण्यासह चार निवासी इमारतींमध्ये ४८ निवासस्थाने, तसेच दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. मात्र, उद्घाटन न झाल्यामुळे ही सर्व घरे वापराविना पडून आहेत. दरम्यान, नवीन पोलीस ठाण्याची इमारत कार्यान्वित करण्यात आली असली तेथून पोलिस ठाण्याचा कारभार सुरू आहे.तर पोलीस वसाहतीचा वापर अद्याप सुरू झालेला नाही.सूत्रांच्या माहितीनुसार, इमारतीचे काम पूर्ण झाले असले तरी संबंधित ठेकेदाराने अद्याप प्रकल्पाचे औपचारिक हस्तांतरण प्रशासनाकडे केले नसल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामुळे उद्घाटन आणि प्रत्यक्ष ताबा या दोन्ही प्रक्रिया रखडल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याच्या प्रतीक्षेमुळेही हा विलंब होत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या प्रकल्पासाठी गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा आमदार मोनिका राजळे यांचा सुरू होता. सन २०२३ मध्ये खासदार सुजय विखे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले होते, तर या प्रकल्पासाठी आमदार मोनिका राजळे यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला होता.

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर आता तब्बल आठ महिने उलटले, तरी पोलिस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी घरे मिळालेली नाहीत. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेली सुविधा वापराविना पडून असल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे की उद्घाटनाच्या राजकारणामुळे हा विलंब होत आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना तातडीने निवासस्थाने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन प्रलंबित प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.

जुनी पोलिस वसाहत मोडकळीस

जुनी पोलिस वसाहत मोडकळीस आल्याने तेथील घरे राहण्यायोग्य राहिली नव्हती. इमारतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून राहावे लागत होते. त्यामुळे ही घरे रिकामी करण्यात आली. मात्र, अद्याप नवीन पोलिस निवासस्थाने उभारण्यात आलेली नसल्याने अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना निवासाच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नवीन पोलिस वसाहतीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT