Mohata Devi Pudhari
अहिल्यानगर

Mohata Devi Devotees Harassment: मोहटादेवी येथे भाविकांना अडवून जबरदस्ती; तिघांवर गुन्हा

पूजेचे साहित्य खरेदीसाठी दबाव; पाथर्डी पोलिसांची कारवाई, भाविकांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: मोहटादेवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडवून पूजेचे साहित्य जबरदस्तीने खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या तिघांविरोधात पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरातील अशा प्रकारांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.12 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास मोहटादेवी कमान परिसरात काही इसम भाविकांच्या चारचाकी वाहनांना मोटारसायकल आडवी लावून अडवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे सचिन अंबादास दहिफळे (वय 18), संदीप महादेव दहिफळे (वय 41, दोघे रा. मोहटे) व गणेश विष्णू धायतडक (वय 25, रा. धायतडकवाडी) हे तिघे भाविकांच्या वाहनांना अडवून पूजेचे साहित्य आमच्या दुकानातूनच घ्यावे असा दबाव टाकत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले असून त्यांच्याविरोधात कॉन्स्टेबल सचिन सुखदेव हाडके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये सरकार पक्षातर्फे पोलिस फिर्यादी होऊन हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मोहटादेवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अशा प्रकारचा त्रास होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. काही प्रकरणांमध्ये भाविक व स्थानिक दुकानदारांमध्ये वाद होऊन हाणामारीचे प्रकारही घडल्याचे समोर आले आहे.

याबाबत काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण यांनी सोशल मीडियावर वास्तवदर्शी पोस्ट शेअर करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या पोस्टमध्ये हायवेवर गाड्या अडवणे, फोटो देऊन ग्राहक फिक्स करणे, तसेच पूजेच्या साहित्याच्या नावाखाली जादा दर आकारण्याचे प्रकार उघडकीस आणले होते. या पार्श्वभूमीवर पाथर्डी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत कारवाई सुरू केली आहे.

भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये व मंदिर परिसरात शिस्त राखली जावी यासाठी पोलिसांकडून पुढील काळातही अशी कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. भाविकांनीही सावध राहून कोणत्याही प्रकारच्या जबरदस्तीला बळी पडू नये, तसेच अशा प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले असून अशी मोहीम सातत्यपूर्ण राबवण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी सांगून यापुढे भाविकांना कोणी त्रास देत असेल तर आम्ही गुन्हे दाखल करणार असा इशाराही पुजारी यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT