Pathardi Illegal Gutkha Raid Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Illegal Gutkha Raid: पाथर्डीत मावा-गुटखा माफियांवर एलसीबीचा धडक छापा; तीन ठिकाणी कारवाई, चार जण अटकेत

अवैध मावा उत्पादन केंद्र उद्ध्वस्त; साडेचार लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, मुख्य आरोपी फरार

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: पाथर्डी शहर व परिसरात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, गुटखा आणि मावा विक्री व उत्पादन करणाऱ्यांविरोधात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी मोठी धडक कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून मावा विक्री व उत्पादनाचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.

या कारवाईत पाचजणांविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपींपैकी गणेश सुनील शिंदे (रा. कसबा पेठ, पाथर्डी) हा फरार असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अभिजित अरकल,अमोल आजबे, राहुल डोके, योगेश कर्डीले, रमिझराजा अत्तार, सतीश भवर, रणजित जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

पहिल्या कारवाईत नगर-बीड महामार्गावरील दीपाली टी परिसरातील पत्र्याच्या शेडवर छापा टाकण्यात आला. तेथे अंबादास गंगाधर गिरी (रा. अकोला, ता. पाथर्डी) व अदित्य गणेश भस्करे (रा.पाथर्डी) हे प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूची विक्री करताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून गोवा १००० गुटखा, विमल पान मसाला, व्ही-वन सुगंधी तंबाखू, राजनिवास पान मसाला, के- तंबाखू, तानसेन पान मसाला तसेच इलेक्ट्रिक दुचाकी असा १ लाख १ हजार १८१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत पाथर्डी-शेवगाव रस्त्यावरील बाबा पान शॉप परिसरात संतोष प्रताप ईधाटे (रा. नाथनगर, पाथर्डी) याच्या ताब्यातून पाच किलो तयार मावा, ९५ किलो सुगंधी तंबाखूमिश्रित सुपारीचा चुरा आणि मोबाईल असा ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा मावा तयार करून विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले.

तिसऱ्या आणि सर्वात मोठ्या कारवाईत २९ मैल परिसरातील निळवंडे रोडलगतच्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकण्यात आला. तेथे ओंकार राजेंद्र उदारे (रा. कसबा पेठ, पाथर्डी) हा इलेक्ट्रिक मशीनच्या साहाय्याने मावा तयार करताना आढळून आला. चौकशीदरम्यान तो गणेश सुनिल शिंदे याच्याकडे कामाला असल्याचे त्याने सांगितले. या ठिकाणाहून मावा तयार करण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक मशीन, ३० किलो सुपारीचा चुरा, तयार मावा, सुगंधी तंबाखूची पाकिटे, इलेक्ट्रिक काटे, मोबाईल आणि इलेक्ट्रिक दुचाकी असा २ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्रात सुगंधी तंबाखू व गुटख्याच्या विक्रीवर बंदी असतानाही आरोपी हे पदार्थ विक्री व उत्पादनासाठी बाळगत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध संबंधित विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सलग कारवाईमुळे खळबळ

स्थानिक गुन्हे शाखेच्या या सलग कारवाईमुळे पाथर्डी शहर व परिसरातील अवैध मावा आणि गुटखा विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT