पाथर्डी: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात शेतीपंपाच्या इलेक्ट्रिक मोटारी, केबल चोरांच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रारी दिल्या, गुन्हेही दाखल झाले, मात्र, तरीही चोऱ्या थांबलेल्या नाहीत. आतातर भाजपा आमदाराच्याच शेतातील साहित्याची चोरी झाल्याने, सर्वसामान्यांचं काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
शेवगाव-पाथर्डीचे आमदार मोनीका राजळे यांचे माजी आमदार आप्पासाहेब राजळे हे सासरे आहेत. राजळे यांची कासार पिंपळगाव शिवारात शेती आहे. सुभाष भडके हे सुमारे ३५ वर्षांपासून राजळे यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात. दि. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास शेतातील विहिरीवरील मोटारींच्या केबल सुस्थितीत होत्या.
मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी केबल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. विहिरीवरील सहा हजार रुपये किंमतीची सुमारे १०० फूट केबल चोरट्यांनी चोरून नेली. याशिवाय, ताराचंद राजळे यांच्या विहिरीवरील दोन हजारांची ४० फूट केबल, मच्छिंद्र राजळे यांची चार हजारांची ८० फूट केबल, अशा एकूण १३ हजार रुपये किमतीची २२० फूट केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. कोपरे येथे राजेंद्र उघडे यांच्या घरासमोरील शेडमध्ये बांधलेल्या तीन शेळ्याही चोरीला गेल्या आहेत.
पाथर्डी तालुक्यात चोऱ्या वाढल्या
पाथर्डी तालुक्यात यापूर्वीही मोठ्या प्रमाणात शेतीतील इलेक्ट्रिक मोटारी, मोटारींच्या केबल तसेच कृषी साहित्य चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल करूनही अशा चोरीच्या घटना सातत्याने सुरूच आहे. रात्रीच्या वेळी शेतांमध्ये जाऊन मोटारी व केबल काढून नेणारी चोरट्यांची टोळी सक्रिय असून, त्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे.
एसपी दखल घेणार का ?
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात विहिरीवरील मोटारी, केबल व अन्य शेती साहित्याच्या चोरीच्या घटना सुरूच आहेत. या घटनांमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, आमदार राजळे यांच्या शेतातील चोरीच्या घटनेनंतर तरी पोलिस अधीक्षक सुदर्शन हे अशा वाढत्या गुन्ह्यांची गंभीरतने दखल घेणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.