पाथर्डी: नगर तालुक्यातील देहरे टोलनाक्याजवळ चार दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून गहू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर दरोडा टाकत चालक व क्लिनरला जबरदस्तीने बांधून ट्रक ताब्यात घेतल्याची गंभीर घटना घडली आहे. दरोडेखोरांनी तब्बल 9 लाख 67 हजार 200 रुपये किमतीचा गहू दुसऱ्या ट्रकमध्ये भरून नेला असून, त्यानंतर चालक-क्लिनरला पाथर्डी तालुक्यातील निंवडुंगे शिवारात सोडून पसार झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील सीतामऊ तालुक्यातील लहुजा येथील रहिवासी जगदीश चतुर्भुज माळी (वय 55, चालक) हा चौदा टायर ट्रक (क्र. आर.जे. 09 जी.ई. 5957) 26 जानेवारी रोजी रात्री े 9 वाजता क्लिनर विजय राधेश्याम चौधरी (रा. माननखेडा, ता. पिंपलोडा, जि. रतलाम, म.प्र.) हे निमज (मध्यप्रदेश) येथून गव्हाचे कट्टे भरून सोलापूरकडे निघाले होते.
दि. 27 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजता, ते देहरे टोलनाक्याजवळ आले. एका 12 टायर ट्रकने त्यांच्या वाहनाला आडवे लावले. या ट्रकमधून चौघे खाली उतरले. त्यापैकी तिघांनी तोंड कापडाने बांधले होते, तर एकाचा चेहरा उघडा होता. आरोपींनी चाकूचा धाक दाखवत चालक व क्लिनरचे हात-पाय जबरदस्तीने बांधून त्यांना ट्रकच्या कॅबिनमध्ये झोपवत ट्रक ताब्यात घेतला. यानंतर आरोपींनी ट्रक नगरच्या दिशेने नेत विळद घाटा चार ते पाच तास थांबवून ट्रकमधील संपूर्ण गहू दुसऱ्या ट्रकमध्ये भरला. त्यानंतर दोघे आरोपी गहूसह पसार झाले, तर उर्वरित दोन आरोपी फिर्यादींच्याच ट्रकमध्ये बसून, त्यातील एकाने ट्रक चालवत पाथर्डी तालुक्यातील निंवडुंगे शिवारात नेला.
बुधवारी (दि. 28) पहाटे 5 वाजता निंवडुंगे शिवारात ट्रक उभा करून आरोपींनी चालक व क्लिनरचे मोबाईल परत देत तेथून पसार झाले. त्यानंतर चालक व क्लिनर यांनी ट्रक घेऊन थेट पाथर्डी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
या दरोड्यात 30 किलो वजनाचे 833 गव्हाचे कट्टे (किंमत 7 हजार 99 हजार 200 रुपये) 50 किलो वजनाचे 120 गव्हाचे कट्टे (किंमत 1 लाख 68 हजार रुपये) असा एकूण 9 लाख 67 हजार 200 रुपयांचा माल लुटण्यात आला. या प्रकरणी चार दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.