Blue Throat Bird Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Blue Throat Bird: पाथर्डीत दुर्मिळ पाहुणा; ‘ब्लू थ्रोट’ पक्ष्याची पहिल्यांदाच छायाचित्रासह नोंद

युरोप–मध्य आशियातून हजारो किमी प्रवास; पाथर्डीच्या पाणथळ क्षेत्रांचे जैवविविधतेतील महत्त्व अधोरेखित

पुढारी वृत्तसेवा

अमोल कांकरिया

पाथर्डी: हिवाळ्याच्या सुरुवातीलाच परदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांनी पाथर्डी परिसरात हजेरी लावली असून, यंदा पाथर्डी जवळील पाणथळ भागात ‌‘ब्लू थ्रोट‌’ (मराठी नावे - शंकर, निळकंठ, चास) या दुर्मिळ हिवाळी पाहुण्याची पहिल्यांदाच ठोस व छायाचित्रासह नोंद झाली आहे. ही नोंद जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, पाथर्डी परिसरातील नैसर्गिक अधिवासाचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करणारी ठरली आहे.

युरोप व मध्य आशियातील थंड प्रदेशांतून सुमारे 4 ते 7 हजार किलोमीटरचा प्रवास करून ‌‘ब्लू-थ्रोट‌’ हा पक्षी हिवाळ्यात भारतात दाखल होतो. पाथर्डी तालुक्यातील पाणथळ व गवताळ भागात त्याचे दर्शन झाल्याने पक्षीप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.स्थानिक वन्यजीव व निसर्ग छायाचित्रकार डॉ. दीपक जायभाये यांनी या दुर्मिळ पक्ष्याचे निरीक्षण करून त्याचे छायाचित्रण केले आहे. उपलब्ध माहितीनुसार, पाथर्डी तालुक्यात ब्लू थ्रोट पक्ष्याची ही पहिलीच छायाचित्रासह नोंद असण्याची शक्यता आहे. या निरीक्षणाला ज्येष्ठ पक्षीनिरीक्षक राजेश काळे यांनी दुजोरा देत नोंदीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. निरीक्षणादरम्यान स्थानिक पक्षीनिरीक्षक प्रदीप फुंदे यांनीही महत्त्वाची मदत केली.

ब्लू थ्रोट हा पक्षी युरोप, स्कँडिनेव्हियन देश, सायबेरिया व मध्य आशियातील थंड प्रदेशांत प्रजनन करतो. हिवाळा सुरू होताच तो हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारत, पाकिस्तान, नेपाळ व श्रीलंका या देशांकडे स्थलांतर करतो. पाणथळ जागा, दलदलीचे भाग आणि दाट गवताळ क्षेत्रे हे त्याचे आवडते अधिवास मानले जातात.

इतर पक्ष्यांचीही हजेरी

  • पाथर्डी परिसरात दर वर्षी अनेक स्थलांतरित पक्षी नियमितपणे दाखल होतात. यंदा येथे माँटेग्यूज हॅरियर (मराठीत माँटेग्यूचा भोवत्या/ हरीण/ माजला शिख्रा) या शिकारी पक्ष्याचे नर व मादी दोन्ही प्रथमच निरीक्षणात आले आहेत. हा पक्षी युरोप व मध्य आशियातील माळरान भागांतून हिवाळ्यात भारतात येतो.

  • सायबेरियन स्टोनचाट, मार्श हॅरियर, वेस्टर्न यलो वॅगटेल, व्हाईट वॅगटेल, कॉमन व रेड क्रेस्टेड पोचार्ड, नॉर्दर्न पिंटेल, गार्गनी, नॉर्दर्न शोव्हलर, रुडी शेलडक, लेसर व्हिसलिंग डक, स्पूनबिल बगळे, लिटल रिंग्ड प्लोव्हर तसेच विविध प्रकारचे सँडपायपर्स यांचीही नोंद पाथर्डी परिसरात झाली आहे.

  • तज्ज्ञांच्या मते, स्थलांतरित पक्ष्यांची ही उपस्थिती पाथर्डी परिसरातील माळरान व पाणथळ क्षेत्रांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करते. मात्र, पाण्याची घटती पातळी, मानवी हस्तक्षेप आणि अधिवास नष्ट होणे यामुळे भविष्यात स्थलांतरित पक्ष्यांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ओळखायचा कसा...

नर ब्लू थ्रोटच्या घशावर उठावदार निळी पट्टी असून तिच्या मध्यभागी तांबूस किंवा पांढरा ठिपका असतो. उडताना त्याच्या शेपटीच्या मुळाशी असलेला नारंगी रंग सहज लक्षात येतो. मादी ब्लू थ्रोट तुलनेने फिकट रंगाची असून घशावर निळी पट्टी नसते. मात्र, मादीमध्येही शेपटीच्या मुळाशी असलेला नारंगी रंग ही महत्त्वाची ओळख ठरते.

गेल्या पाच वर्षांपासून मी पाथर्डी परिसरात नियमित पक्षीनिरीक्षण करत आहे. मात्र, ब्लू थ्रोट हा पक्षी येथे प्रथमच दिसला. पाणथळ जागांचे संवर्धन केल्यास अशा स्थलांतरित पक्ष्यांची संख्या भविष्यात निश्चितच वाढेल.
डॉ. दीपक जायभाये, वन्यजीव व निसर्ग छायाचित्रकार
ब्लू थ्रोट हा महाराष्ट्रात दुर्मिळ हिवाळी पाहुणा आहे. पाथर्डी परिसरात त्याची छायाचित्रासह नोंद होणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असून, येथील पाणथळ व गवताळ अधिवास स्थलांतरित पक्ष्यांसाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट होते.
राजेश काळे, ज्येष्ठ पक्षीनिरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT