

जामखेड: नववर्षाच्या पहाटेच जामखेड शहरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना घडली. तपनेश्वर गल्ली परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांना भरधाव पिकअप वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात विमल महादेव गांगर्डे (वय 54, रा. तपनेश्वर गल्ली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला किरकोळ जखमी झाली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघाताची तत्काळ दखल घेत नगराध्यक्षा प्रांजली चिंतामणी यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी आणि प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक मोहन पवार व प्रवीण होळकर क्शन मोडवर आले. त्यांनी घटनास्थळी भेट देत रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारी झाडे तातडीने हटविण्याची कार्यवाही करून घेतली. भविष्यात अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे नगरसेवक मोहन पवार व प्रवीण होळकर यांनी सांगितले.
खर्डा चौक ते अमरधाम रोड, ढवळे किराणा दुकानासमोर, भक्ती साडी सेंटर, सेंच्युरी कॉम्प्युटर, धर्मयोद्धा चौक, तसेच शांतीनाथ आश्रम ते भुतवडा रोड या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज पेठेप्रमाणेच या परिसरातही वाहतूक सुरक्षेच्या ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.