Akshay Pawar Pudhari
अहिल्यानगर

Akshay Pawar IFS Success Story: लोहार कुटुंबातून IFS अधिकारी! अक्षय पवारचा देशात 81 वा क्रमांक

पाथर्डीतील घिसाडी समाजातील तरुणाचे यश; कठोर परिश्रम आणि सातत्याने UPSC मध्ये यश

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: तप्त लोखंडावर घणाचे घाव घालत आकार देण्यात माहीर असलेल्या कष्टकरी दाम्पत्याने आपल्या मुलालाही शिक्षणाच्या भट्टीत तापवून जिद्दीच्या ऐरणीवर सातत्याचे घाव घालत आकार दिला आणि त्याच्यातून भारतीय वन सेवेतील एक अधिकारी घडविण्याची किमया साधली! तो घडलेला आयएफएस अधिकारी आहेे पाथर्डी शहरातील वीर सावरकर मैदान परिसरातील अक्षय हरिभाऊ पवार आणि स्वतः परिस्थितीच्या उन्हाचे चटके सोसत मुलाला शिक्षणाच्या भट्टीत तावून सुलाखून काढणारे आई-वडील आहेत --- आणि हरिभाऊ साहेबराव पवार.

अक्षयने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस परीक्षेत देशात 81 वी रँक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. याचा निकाल दोन दिवसांपूर्वी लागला. घिसाडी समाजातील या तरुणाच्या यशामुळे संपूर्ण पाथर्डी तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अक्षयचे वडील हरीभाऊ साहेबराव पवार व आई पारंपरिक पद्धतीने लोखंड तापवून शेतीची अवजारे तयार करण्याचे काम करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी मुलाच्या शिक्षणात कोणतीही कमतरता भासू दिली नाही.

लोखंडावर घाव घालत त्यांनी जशी शेतीची अवजारे घडवली, त्याच जिद्दीने आणि कष्टाने आपल्या मुलाचे भविष्यही घडवले. विशेष म्हणजे, अक्षयसुद्धा आई-वडिलांच्या कामात मदत करत अभ्यास करत होता. अक्षयचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, नाथनगर येथे झाले. त्यानंतर पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण त्याने पाथर्डी येथील श्री तिलोक जैन विद्यालयात पूर्ण केले. पुढे पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून धातुशास्त्र विषयात बी.टेक. पदवी घेतल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.

स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी अक्षयने एक वर्ष पाथर्डीत, तर तब्बल अडीच वर्षे दिल्लीमध्ये राहून कठोर परिश्रम घेतले. 2019 पासून सुरू झालेला त्याचा अभ्यासाचा प्रवास कोविड काळात काहीसा खंडित झाला; मात्र 2021 मध्ये नव्या जोमाने त्याने पुन्हा तयारी सुरू केली. अपयशाने न खचता सातत्य कायम ठेवत चौथ्या प्रयत्नात त्याने हे मोठे यश मिळवले. या यशाबाबत अक्षय म्हणाला, की मोठ्यांचे आशीर्वाद, सातत्यपूर्ण मेहनत आणि अपयशातून पुन्हा उभे राहण्याची जिद्द यामुळेच हे यश मिळाले. अपयश आले तरी खचून न जाता नव्या ताकदीने प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.

अक्षय पवार याला मुलाखतीसाठी पाथर्डीचे भूमिपुत्र तथा तेलंगणाचे पोलिस महासंचालक महेश भागवत यांनी विशेष मार्गदर्शन केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाचा मोठा लाभ झाल्याचे अक्षयने सांगितले. दरम्यान, यंदा देशभरातून 148 उमेदवारांची भारतीय वन सेवेत निवड झाली. त्यामध्ये 20 मराठी उमेदवारांचा समावेश आहे. अक्षयच्या यशामुळे पाथर्डीसह संपूर्ण जिल्ह्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT