

नगर तालुका: बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्र प्रकाशात दरवर्षी वन विभागातर्फे जंगलातील पशुपक्षी, तसेच प्राण्यांची गणना, निरीक्षण करण्यात येत असते. चालू वर्षी एक मे रोजी केलेल्या निरीक्षणामध्ये तालुक्यात सर्वाधिक रानडुकरांची संख्या आढळून आली. हरीण, काळवीट, खोकड, मोर, ससा, लांडगा, कोल्हा, उदमांजर, रानमांजर, साळींदार, मोर, तसेच विविध जातींच्या पक्ष्यांचा मुक्त संचार पाहावयास मिळाला. साप, घोरपड, शामिलियन सरडा याचबरोबर सरपटणारे विविध जीव वन विभागाच्या निदर्शनास आले.
तालुक्यात सुमारे साडेसहा हजार हेक्टर वनक्षेत्र आहे, तसेच आर्मीचेही मोठे क्षेत्र आढळून येते. खासगी मालकीच्या डोंगररांगाही मोठ्या प्रमाणात आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात गर्भगिरीच्या डोंगररांगांचे अस्तित्व आढळून येते. या डोंगररांगांमध्ये लपन व सहज उपलब्ध होणारे अन्न यामुळे वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून येतो. यापूर्वी अनेक वेळा या परिसरात बिबट्याचाही वावर आढळून आलेला आहे.
बुद्ध पौर्णिमेचा चंद्र प्रकाश सर्वात जास्त उजेड देणारा प्रकाश असतो. त्यामुळे वन विभागातर्फे जंगलामध्ये पाणवठा, तसेच वन्य प्राण्यांचा, पक्ष्यांचा वावर असेल अशी ठिकाणे निवडून निरीक्षण करण्यात येत असते. तालुक्यातील सर्व मंडलांमध्ये करण्यात आलेल्या निरीक्षणातून रानडुकरांची संख्या सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर इतर विविध जातींच्या पक्ष्यांचाही वावर आढळून आला. प्राण्यांचा मुक्त संचार पाहावयास मिळाला.
वन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वन्यप्राणी निरीक्षण मोहिमेत अनेक दुर्मिळ, तसेच नियमित आढळणाऱ्या वन्यजीवांचे दर्शन घडले. रूपेरी चांदण्यांच्या प्रकाशात जंगलातील प्रत्येक हालचाल टिपताना वनाधिकारी व निसर्गप्रेमींना वेगळाच रोमांच अनुभवायला मिळाला. चंद्राच्या नैसर्गिक प्रकाशामुळे प्राणी अधिक सहजपणे निरीक्षणात आल्याचे वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले. वन विभागाच्या या उपक्रमामुळे जंगलातील जैवविविधतेचा अभ्यास करण्यास मदत होत असून, वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती होत आहे.
तालुका निसर्ग संपदेने नटलेला आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या डोंगररांगा वन्य प्राण्यांना आकर्षित करत असतात. त्यामुळे जंगलामध्ये वन्य प्राण्यांचा व पशु-पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात मुक्त संचार आढळतो. वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी जंगलातील मानवाचा हस्तक्षेप कमी होणे गरजेचे आहे.
अविनाश तेलोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी
वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी डोंगराच्या कडेला आपले बांध जाळू नयेत. तसेच वन विभागाच्या हद्दीत धूम्रपान करू नये. वणव्यामुळे वनसंपदा, तसेच वन्य प्राण्यांचे मोठे नुकसान होते. गावोगावी वणवा विरोधी पथक तयार करणे गरजेचे आहे.
मनेष जाधव, वनरक्षक, जेऊर