Ajit Pawar Candidate Withdrawal Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Ajit Pawar Candidate Withdrawal: अजित पवार गटाच्या उमेदवाराची माघार; भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) थेट लढत

संजय भागवत यांच्या अनपेक्षित माघारीने राजकीय समीकरणे बदलली; नगराध्यक्ष पदासाठी द्विपक्षीय सामना निश्चित

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: नगरपालिका निवडणुकीत बुधवारी नाट्यमय राजकीय घडामोडी घडून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय भागवत यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला. त्यामुळे संपूर्ण राजकीय समीकरणच कोलमडले. निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते यांच्या उपस्थितीत त्यांची माघार अधिकृतरीत्या नोंदवण्यात आली. यामुळे निवडणुकीला अनपेक्षित वळण मिळाले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पाथर्डी नगरपालिकेचे मूळ मतदान 2 डिसेंबरला होणार होते. मात्र नगराध्यक्षपदाची एक जागा व प्रभाग क्रमांक 8 ‌‘अ‌’मधील जागा न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आली. नवी प्रक्रिया 4 डिसेंबरपासून सुरू झाली आणि 10 डिसेंबर हा अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. त्यात निवडणुकीचे रंगमंच सजलेले असतानाच ‌‘भागवत एक्झिट‌’ने वातावरण तापवले आहे. या माघारीमुळे राष्ट्रवादी (अजित पवार) गटातील आमदार शिवाजी गर्जे व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना मोठा धक्का बसला आहे. या गटाने नगराध्यक्ष पदासह 20 पैकी 19 नगरसेवक पदांवर उमेदवार उभे केले होते. परंतु अंतिम क्षणी प्रमुख उमेदवारच माघारी गेल्याने संपूर्ण पॅनल आता नेतृत्त्वाविना निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागत आहे.

राजळे-आव्हाड यांच्या हालचाली कारणीभूत?

भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अभय आव्हाड व आमदार मोनिका राजळे यांनी पडद्यामागे डाव टाकून भागवत यांना माघार घेण्यास प्रवृत्त केल्याचे बोलले जाते. राजळे-आव्हाड यांनी आधीच भागवत यांचे मनोबल डळमळीत होऊ शकते हे ओळखून त्यांच्याशी संपर्क साधला आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले, असे सांगितले जात आहे. पक्षातील वरिष्ठांना कल्पना न देता भागवत यांनी माघार घेतली.

भागवत यांच्या जागी पर्यायी उमेदवार म्हणून एबी फॉर्मवर ठेवलेले राहुल ढाकणे यांचा अर्ज छाननीतच बाद करण्यात आला होता. परिणामी अजित पवार गटाची मोठी गोची झाली आहे. ढाकणे यांचा अर्ज अन्यायाने बाद केल्याचा आरोप करत हा गट न्यायालयात जाण्याची तयारी करीत आहे. यामुळे निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. भागवत यांनी अर्ज माघारी घेतल्याने नगराध्यक्ष पदाची लढत भाजपचे अभय आव्हाड, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे बंडू पाटील बोरुडे यांच्यात असून यामुळे पाथर्डीत प्रतिष्ठेची भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) अशी थेट लढत रंगणार आहे.

नगरसेवकपदासाठी 20 जागांवर 63 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजप : 20, राष्ट्रवादी (शरद पवार) : 19, राष्ट्रवादी (अजित पवार) : 19, काँग्रेस : 1, आप : 1 आणि अपक्ष : 3 असे उमेदवार शिल्लक आहेत. 11 डिसेंबर गुरुवारपासून प्रचारमोहीम जोर पकडणार असून पाथर्डीतील निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन गटांत झालेल्या फाटाफुटीनंतर अजित पवार गट तालुक्यात फारशा जोरात नसतानाही त्यांनी सर्व जागांवर उमेदवार उभे करून अस्तित्व दाखवले होते. मात्र नगराध्यक्ष उमेदवारच माघारी गेल्याने हा गट गंभीर संकटात सापडला आहे. पाथर्डीतील ही निवडणूक आता पूर्णपणे अनपेक्षित आणि रोमांचक बनली असून मतदारही अंतिम निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

पक्षाने पाठबळ न दिल्याने...

पक्षाने अपेक्षित पाठबळ न दिल्याने आपण माघार घेतली असा खुलासा भागवत यांनी ‌‘पुढारी‌’शी बोलताना केला. भागवत म्हणाले की गेल्या 15 वर्षांपासून मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिलो. त्याची दखल घेऊन व माझी मागणी नसतानाही पक्षाने मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. मात्र मला व नगरसेवक पदाच्या बहुतांश उमेदवारांना पक्ष व श्रेष्ठींकडून पाहिजे त्या प्रमाणात साथ व रसद मिळाली नाही. मी माघारीसाठी मी आर्थिक तडजोड केलेली नाही. कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही अथवा कोणाचाही प्रचार करणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT