पारनेर: हेमलानाईक तांडा (सुतारवाडी ढवळपुरी शिवार, ता. पारनेर) येथील महिलेवरील अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात पारनेर पोलिस ठाण्याने धडक कामगिरी केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या २४ तासांत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २२ रोजी रात्री ८.३०च्या सुमारास सुतारवाडी, ढवळपुरी शिवारातील हेमालानाईक तांडा येथे ही घटना घडली. आरोपी सचिन रमेश राठोड (वय ३१) याने दारूच्या नशेत वाईट हेतूने फिर्यादी महिलेच्या घरात बेकायदा प्रवेश केला.
फिर्यादीने त्याच्या लहान मुलीला मारणे, जेवण दिल्याच्या रागातून त्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केला आणि तिला, तिच्या मुलाला व वृद्ध सासूला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक जी. एन. डहाळे यांनी तत्काळ तपास सुरू केला. घटनास्थळ पंचनामा, साक्षीदारांचे जबाब, जखमींचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि इतर कायदेशीर प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून पुरावे गोळा करण्यात आले.
या कामगिरीत तपासी अंमलदार सहायक फौजदार जी. एन. डहाळे यांच्यासह पोलिस हवालदार जालिंदर लोंढे आणि पोलिस कॉन्स्टेबल केदार यांनी मोलाचे सहकार्य केले.