पारनेर/जवळा: तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणातील दहा आरोपींना दिलेला अटकपूर्व जामीन अहिल्यानगर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश लोणे यांनी शुक्रवारी रद्द केला. आरोपींमध्ये तलाठी किरण फातले, क्रांती शुगर या खासगी कंपनीचे चेअरमन ज्ञानेश नवले, संचालक पांडुरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकू नवले, जालिंदर नवले, गुलाब नवले, शिवराज नवले, श्रीधर नवले, निवृत्ती नवले यांचा समावेश आहे.
पारनेर न्यायालयाच्या आदेशानंतर वर्षभरापूर्वी राज्य सहकारी बँक आणि क्रांती शुगर कंपनीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता. पुढे सत्र न्यायालयाने आरोपींचा रिव्हीजन अर्ज फेटाळला. त्यानंतर आरोपींनी सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज अटी-शर्तींनुसार मंजूर केला होता.
मात्र अटी-शर्तीचा भंग केल्याचा प्रकार लक्षात येताच, याप्रकरणी पारनेर कारखाना बचाव समितीने आरोपींचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होता. आरोपींनी अटकपूर्व जामिनाच्या नावाखाली गैरफायदा घेऊन फिर्यादीवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, गुन्ह्यातील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा युक्तिवाद करण्यात आला. आरोपी तपासात पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे पुरावेही फिर्यादीकडून न्यायालयासमोर ठेवण्यात आले.
सत्र न्यायालयाने दखल घेऊन आरोपींना मंजूर केलेल्या अटकपूर्व जामिनाचे संरक्षण काढून घेतले आणि आरोपींना तातडीने अटक करून पुढील तपासाचे आदेश पोलिसांना दिले. याप्रकरणी सुमारे 48 बनावट सात-बारा उतारे तयार करणारा श्रीगोंदा - विसापूर येथे सध्या कार्यरत असलेला तलाठी किरण फातले याचाही अटकपूर्व जामीन न्यायालयाने रद्द केला आहे.
तपास यंत्रणेवर दबाव
या गुन्ह्यात एकूण 42 साक्षीदार आहेत. त्यांची यादी फिर्यादीने तपासी अधिकाऱ्ांना देऊनही आरोपींच्या राजकीय दबावापोटी साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात नाहीत, असा आरोप फिर्यादी पक्षाने केला आहे..
तपासी अधिकाऱ्याची बदली
या गुन्ह्याचे तपासी अधिकारी असलेले पारनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर यांची मुदतीपूर्वीच बदली करण्यात आली आहे. त्यांची ही बदली या गुन्ह्यात आरोपींना मदत न केल्याच्या कारणाने केल्याचा आरोप कारखाना बचाव समितीचे बबन कवाद, साहेबराव मोरे यांनी केला आहे.
सदर प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश लोणे यांच्या समोर झाली. कारखाना बचाव समितीतर्फे ॲड. रामदास घावटे, ॲड. सुदाम साठे, ॲड. उन्मेश चौधरी, ॲड. सोमनाथ गोपाळे यांनी युक्तिवाद केला.