Parner Power Supply Issue Farmers Protest Pudhari
अहिल्यानगर

Parner Power Supply Issue Farmers Protest: पारनेरमध्ये वीजपुरवठ्याचा बोजवारा; संतप्त शेतकऱ्यांचे उपकेंद्रासमोर आंदोलन

कमी दाब आणि अघोषित भारनियमामुळे पिके धोक्यात; आरडीएसएस योजनेची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर: महावितरणच्या ढिसाळ आणि निष्काळजी कारभारामुळे पारनेर तालुक्यातील पळसपूर, काटाळवेढा, म्हसोबा झाप परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. गावात वीज उपकेंद्र असतानाही सातत्याने होणारा कमी दाबाचा वीजपुरवठा आणि अघोषित भारनियमामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल उगले व म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांच्या नेतृत्वाखाली उपकेंद्रासमोर आंदोलन केले.

पळसपूर, म्हसोबा झाप परिसरात कांदा, टोमॅटो, फळबागा, मिरची आणि भुईमूग ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. सध्या कडाक्याच्या उन्हामुळे पाण्याची पातळी खालावली असून उपलब्ध पाणी पिकांना देण्यासाठी विजेची नितांत गरज आहे. मात्र, वीजपुरवठा सुरळीत नसल्याने आणि व्होल्टेज कमी असल्याने शेतीपंप चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

सरकारच्या आरडीएसएस योजनेअंतर्गत या भागात कामांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, या योजनेचा बोजवारा उडाला असून कामे प्रलंबित आहेत. नवीन वीज जोडण्या आणि पायाभूत सुविधांची कामे रेंगाळल्याने सरपंच प्रकाश गाजरे यांनी प्रशासनाला तीव्र शब्दांत सुनावले. कामे तातडीने मार्गी लावून नवीन वीज जोडण्या न दिल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा गाजरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

वारंवार तक्रारी करूनही महामंडळाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण आहेर म्हणाले, सबस्टेशन असूनही सेवा मिळत नसेल, तर ते केवळ प्रशासनाचे अपयश आहे.

या आंदोलनात राष्ट्रवादी पक्षाचे टाकळी ढोकेश्वर गटाचे नेते अमोल उगले, सरपंच प्रकाश गाजरे यांच्यासह प्रवीण आहेर, अभय आहेर, आशुतोष आहेर, संजय आहेर, अनिकेत अडसरे, राजेश ढोले, राजू आहेर, सुनील आहेर, विनायक आहेर, मयूर शिंदे, तुषार अडसरे, बंटी वाघमारे, गणेश आहेर, सागर ढोले व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या आंदोलनामुळे आता विद्युत महामंडळ काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरडीएसएस योजनेची विद्युत जोडणी करा: गाजरे

पळसपूर येथील आरडीएसएस योजनेचे काम पूर्ण झालेले असून विद्युत जोडणी बाकी आहे. विद्युत जोडणी त्वरित करण्यात यावी अन्यथा 29 एप्रिल रोजी टाकळी ढोकेश्वर सबस्टेशन येथे आंदोलन करण्यात येईल, असे म्हसोबाचा सरपंच प्रकाश गाजरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT