पारनेर : पारनेर तालुक्यातील किन्ही येथे हरभऱ्याच्या शेतात गवत काढत असलेली महिला बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जागीच ठार झाली. मंगळवारी (दि. 2) दुपारी सुमारे 4 वाजता ही घटना घडली. भागूबाई विश्वनाथ खोडदे (वय 70) असे तिचे नाव आहे.
भागूबाई आपल्या शेतात एकट्याच काम करत होत्या. त्यांचे पती विश्वनाथ खोडदे जवळच शेतात पाणी देत होते. त्यांना ऐकू कमी येत नसल्याने झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही. काही वेळाने हरभऱ्याच्या वाफ्यात भागूबाई आडव्या पडल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता चेहऱ्यावरील मास पूर्णपणे खाल्लेले आढळले.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी पारनेर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद झाली.
किन्ही परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या वावर वाढल्याचे बोलले जात होते. यापूर्वीही जनावरे मारण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून ग्रामस्थांनी वन विभागाकडे तत्काळ बिबट्या पकडण्याची मागणी केली आहे.
नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश येईपर्यंत मयत महिलेचा अंत्यविधी होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका किन्ही ग्रामस्थांसह शेतकरी नेते अनिल देठेे यांनी घेतली होती; परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट नागपूर येथील वरिष्ठांशी संवाद साधून दिला. बिबट्याला ठार मारण्याच्या आदेश देण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर महिलेचा अंत्यविधी रात्री उशिरा करण्यात आला.