श्रीरामपूर: विना परवाना अवैधरित्या गुंगीकारक नशा आणणाऱ्या नायट्राझेपमच्या गोळया विकणाऱ्या भुसावळ येथील एका तरुणास श्रीरामपूर बस स्टॅण्डवर पोलिसांनी रंगेहात पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून 24 हजार 26 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. काल्या ऊर्फ तस्लीम सलीम शेख (रा. भुसावळ, जिल्हा, जळगाव) असे त्याचे नाव आहे. (Latest Ahilyanagar News)
श्रीरामपूर बस स्टॅण्ड परिसरातील वॉर्ड नं.5 येथे एक संशयीत इसम गुंगीकारक नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी आला आहे, अशी गुप्त खबर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली. तत्काळ पोलिस पथकाने बस स्टॅण्ड परिसरात संशयीत इसमाचा शोध घेतला. बस स्टॅण्डच्या भिंतीच्या आडोशाला शौचालयासमोर एक इसम संशयीतरित्या कापडी पिशवी हातामध्ये घेवून, फिरताना आढळला.
व्यक्तीस ताब्यात घेतले. काल्या ऊर्फ तस्लीम सलीम शेख (रा. भुसावळ) असे त्याने स्वतःचे नाव सांगितले. ‘पिशवीमध्ये काय आहे,’ असे पोलिसांनी विचारले असता, ‘गुंगीकारक नशा आणणाऱ्या ‘नायट्राझेपम गोळ्या’ आहेत. त्या मी विक्रीसाठी येथे आणल्या आहेत,’ असे त्याने सांगितले. पोलिसांनी त्यांच्या कडून 1 हजार 26 रुपये किमतीच्या नायट्राझेप गोळ्यांची 19 पाकिटे व 23 हजार रोकड असा एकूण 24 हजार 26 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. पोलिसांनी काल्या ऊर्फ तस्लीम सलीम शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक नितीन देशमुख व सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र शिखरे करीत आहे.