आमदार तांबे यांचा जलसंपदा कार्यालयावर मोर्चा Pudhari
अहिल्यानगर

Nilwande Water Supply Sangamner 2025: निळवंडेच्या पाण्यावर संगमनेरालाही हक्क; आमदार तांबे यांचा जलसंपदा कार्यालयावर मोर्चा

शेतकऱ्यांच्या मागण्यांकरीता 15 दिवसांत उपाय न केल्यास आंदोलनाचा इशारा; रस्ते, पूल आणि पाणी वाटपावर तातडीने काम करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर : निळवंडेच्या पाण्यावर सर्वांचा हक्क आहे. त्यामुळे पाणी वाटप करताना संगमनेरलाही न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्या 15 दिवसांत पूर्ण न झाल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.(Latest Ahilyanagar News)

घुलेवाडी येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर निळवंडे कॅनॉलच्या शेजारील रस्त्यांच्या दुरवस्था, लोखंडी पूल, याचबरोबर वितरिकांचे काम सुरू नसल्याने संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मोर्चा संपन्न झाला. यावेळी आमदार सत्यजित तांबे बोलत होते.

यावेळी समवेत तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, पांडुरंग पाटील घुले, रामहरी कातोरे, संपतराव डोंगरे, दत्ता कोकणे, विष्णुपंत रहाटळ, विलास कवडे, सचिन दिघे, मारुती कवडे, सुमित पानसरे, रमेश नेहे, सनी ठोंबरे, अक्षय दिघे, संतोष नागरे, आनंद वर्पे, निर्मला राऊत, संतोष हासे, सुहास आहेर, किरण रोहम, प्रदीप हासे, प्रमोद पावशे गोरख सोनवणे हर्षल राहणे, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.

आ. सत्यजित तांबे म्हणाले की, दुष्काळी भागाला पाणी मिळावे, याकरीता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. लाभक्षेत्रातील वितरिकांच्या कामांसाठी 1000 कोटी रुपयांचा निधी त्यांनी मंजूर करून घेतला. मात्र सध्या ही कामे काही विशिष्ट भागात सुरू असून संगमनेर तालुक्यात तातडीने कामे सुरू करावी, याचबरोबर कॅनल शेजारच्या रस्ते दुरुस्तीसह शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावले पाहिजे, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी पाटबंधारे विभागाला दिली.

गरज असेल तेथेच अस्तरीकरण करा. मात्र सुरू असलेल्या अस्तरीकरण करण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाची सुरू आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने रस्ते व पुल दुरुस्तीची पाहणी करावी. आवश्यक ठिकाणी मुरमाची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे प्रत्येक गावामध्ये जाऊन सर्व शेतकऱ्यांना कमांड मध्ये येणाऱ्या क्षेत्राची माहिती द्यावी. सर्वांना पाणी मिळाले पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी आहे.

याबाबत जलसंपदा विभाग काय उपाययोजना करणार याची तातडीने माहिती द्यावी. तसेच पाणीपट्टी वसुली करता सक्ती करू नये. कॅनॉलच्या हद्द निश्चित कराव्यात.जोपर्यंत पाण्याचे नियोजन व्यवस्थित होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीने पाणीपट्टी न भरण्याचे ठराव करावेत आणि जलसंपदा विभागाने याबाबत सक्ती करू नये.

यावेळी संपतराव डोंगरे, आनंद वर्पे पांडुरंग पाटील घुले, दत्ता कोकणे, रामहरी कातोरे, यांच्यासह विविध शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी प्रमोद बोंद्रे, संगम आहेर ,अतुल कडलक, शुभम घुले, किसन खेमनर ,नितीन सांगळे, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यकारी अभियंता प्रदीप हासे व अमोल कवडे यांनी निवेदन स्वीकारले.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

निळवंडे कॅनॉल लगतच्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी त्याचप्रमाणे कॅनॉलमधून गळती थांबवावी. पीडीएन योजनेबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती द्यावी, किती लाभार्थी शेतकरी व किती क्षेत्र सिंचनाखाली येईल, याची माहिती द्यावी. कॅनॉल वरील काँक्रीट व लोखंडी पुलाचे काम तातडीने करावे. तसेच कॅनॉल फुटणार नाही याची योग्य खबरदारी घेताना मोठ्या ओढ्या नाल्यांमध्ये ओर फ्लोचे पाणी घेण्यासाठी ज्यादा एसकेप टाकावेत अशी मागणी केली आहे.

हेड टू टेल ‌‘स्काडा योजना‌’

तालुक्यातील व निळवंडे लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळावे, याकरता माजी मंत्री थोरात यांनी मध्यप्रदेशच्या माधवपूर येथे जाऊन स्काडा योजनेअंतर्गत सर्वांना पाणी मिळेल, अशी योजना तयार केली, यामध्ये प्रत्येक आठ हेक्टरवर पाणी पोहोचवले जाणार आहे. याकरता तत्कालीन जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 1000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. मात्र या अंतर्गत 150 कोटी रुपये निधी खर्च झाला असून कामे कुठून सुरू आहेत, हे माहीत नाही. अधिकाऱ्यांनी हेड टू टेल सर्वे करून तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही आ. तांबे म्हणाले.

आमचा जन्मच आंदोलनातून

संघर्ष आणि आंदोलन आम्हाला नवीन नाही. आमचा जन्मच आंदोलनातून झाला आहे. नागरिकांच्या हक्कासाठी आपण कायम लढलो असून अगदी दिल्लीपर्यंत आमच्यावर केसेस आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आपण तातडीने दोन्ही जलसंपदा मंत्र्यांशी बोलणार असून पंधरा दिवसात कामे पूर्ण करा मात्र कामाची अंमलबजावणी आजपासून सुरू करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी आमदार तांबे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT