

Heavy rains will be a blessing for the sugar industry!
कैलास शिंदे
नेवासा : यंदाच्या जोरदार पावसाने सर्वत्र हाहाकार केला असल्याने पाणी पातळी वाढणार आहे. त्यामुळे ऊसपिकाला सुगीचे दिवस येण्याची शक्यता वाटत असून, अतिवृष्टी साखर उद्योगाला 'कृपादृष्टी' ठरणार असल्याचे दिसते. यंदा ऊस उत्पादन वाढणार असून, ऊस गळीत हंगाम उंबरठ्यावर आला आहे. साखर कारखान्यांची यंदाच्या गळिताची तयारीही सुरू झाली आहे.
झालेल्या या पावसाळ्यात अतिवृष्टीने साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला असून, सर्वच धरणे भरल्याने ऊस उत्पादन क्षेत्र वाढणार आहे. उसाच्या पळवापळवीवरून होत असलेले महाभारत यंदा व पुढील वर्षीही थांबणार आहे. सहकारी व खासगी साखर कारखाने क्षेत्रात आता कारखान्यांना गळीत हंगामाचे वेध असून, तशी तयारीही सुरू झाली आहे. उसासह सहवीज, इथेनॉल व मळी या उपपदार्थांचीही गोडी कारखान्यांच्या उत्पन्नात यंदा आणखी भर घालणार आहे.
साखर कारखान्याचे गळीत हंगाम उंबरठ्यावर आले आहेत. खासगी साखर कारखान्याचे पदार्पण व बहुतेक सहकारी, खासगी कारखान्यांनी वाढवलेली दैनंदिन ऊस गाळप क्षमता यामुळे सहकारी साखर कारखानदारीसमोर गेल्या काही हंगामात ऊस मिळवण्यासाठी पळवापळवीचे महाभारत घडले. उसाचे कमी उत्पादनामुळे असे घडले. यंदा अतिवृष्टी झाल्याने साखर उद्योगास फायदा ठरणार आहे. अतिवृष्टीने लहान मोठी धरणे भरल्याने उसापासून अन्य पिकांकडे वळलेला शेतकरी पुन्हा उसाच्या शेतीकडे वळेल असे चित्र आहे. अतिवृष्टीने कापूस, तूर, सोयाबीन अशा पिकांना फटका बसला. मात्र, उसाला बळ मिळणार आहे.
नैसर्गिक अतिवृष्टीसारख्या संकटाशी झुंज देत तग धरलेले ऊस हे एकमेव पीक ठरले आहे. त्यामुळे उसाकडे पाठ फिरवलेले शेतकरी आता उसाच्या लागवडी वाढवण्याकडे वळताना दिसत असून, साखर उद्योगासाठी हे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. गेल्या काही हंगामापासून उसापासून साखर या मुख्य उत्पादनापेक्षाही इथेनॉल, मळी, सहवीजनिर्मिती या उपपदार्थ निर्मितीने मोठा आर्थिक आधार कारखान्यांना दिला आहे.