श्रीगोंदा : खासदार नीलेश लंके यांनी तालुक्यातील आढळगाव येथील प्राथमिक शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला.
लंके गुरुवारी श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर होते. आढळगाव येथील शाळेस त्यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. खासदारांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील प्रश्न विचारले. तसेच विद्यार्थ्यांच्या वही-पुस्तकांची पाहणी करून अभ्यासाची तयारी तपासली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्नांची उत्तरे देत आपली गुणवत्ता दाखवून दिली.
यावेळी शिक्षकांशीही चर्चा करून शाळेस येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. शाळेतील सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शैक्षणिक उपक्रमांविषयी माहिती घेतली.आढळगाव शाळेतील पट संख्या, विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून लंके यांनी समाधान व्यक्त केले. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी मुख्याध्यापक उत्तरेश्वर मोहोळकर, सरपंच शिवप्रसाद उबाळे, प्रा. संजय लाकूडझोडे, सागर वाकडे, सुभान तांबोळी, गणेश गाढवे व इतर शिक्षक उपस्थित होते. खासदारांच्या या अनपेक्षित भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पालकांकडूनही या भेटीचे स्वागत करण्यात आले.