

हल्ला करणारे देखील दोन अल्पवयीन विद्यार्थीच
वडगाव आनंद येथील रेवबाई बालाजी देवकर विद्यालयातील घटना
एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील परमार्थिक सेवा संघ, मुंबई संचलित रेवबाई बालाजी देवकर या विद्यालयांमध्ये नववीच्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये आठवीत शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. 25) दुपारी अडीच वाजण्याच्या शाळेच्या आवारामध्ये घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, गुरुवारी (दि. 26) रात्री उशिरा आळेफाटा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, वडगाव आनंद येथील रेवबाई बाळाजी देवकर या शासन अनुदानित शाळेतील आठव्या इयत्तेतील दोन विद्यार्थी शाळेच्या आवारातच नववीतील विद्यार्थ्याचे भांडण सोडवायला गेले. या वेळी नववहच्या विद्यार्थ्याने धारदार शास्त्राने या दोघांवर वार केले. ही घटना शाळेच्या मधल्या सुटीदरम्यान शौचालयाजवळ घडल्याचे सांगण्यात येते.
घडलेला प्रकार निंदनीय असून, संस्थापातळीवर यापुढे शाळेच्या आवारामध्ये असे कोणतेही अनुचित प्रकार होणार नाहीत, याबाबत काळजी घेतली जाईल.
उल्हास विठ्ठल देवकर, संस्था अध्यक्ष
गुन्हा रजिस्टर नंबर 61/2026 बीएनएस कलम 109 अन्वये दोन अल्पवयीन मुलांना मारहाण करणाऱ्या दुसऱ्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वास जाधव, पोलिस निरीक्षक, आळेफाटा पोलिस ठाणे
दरम्यान, घटना घडल्यानंतर तातडीने शिक्षकांनी या दोन्ही जखमी विद्यार्थ्यांना आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले असून, यातील एकाची तब्येत गंभीर असल्याचे वैद्यकीय उपचार करीत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले. यातील एका अल्पवयीन मुलाच्या श्वसननिकेला गंभीर दुखापत झाल्याने त्याची स्वर नलिका खराब होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
जखमी मुलांपैकी एकाचे मामा यांची आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद उशिरा दाखल करून घेतली जात आहे. या शाळेमध्ये एकूण 432 विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. गुरुवारी (दि. 26) पालकांनी या शाळेमध्ये जाऊन आमच्या मुलांच्या संरक्षणाचे काय असा सवाल संस्थेला विचारला असल्याचे समजते.
दरम्यान, शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका मंगला अंकुश घाडगे यांनी या घटनेची माहिती देण्यास नकार दिला.