Newasa Student Newspaper Library Pudhari
अहिल्यानगर

Newasa Student Newspaper Library: नेवाशातील विद्यार्थ्यांचा अनोखा पुढाकार; खाऊच्या पैशातून सुरू केले वर्तमानपत्र वाचनालय

कुसुमाग्रज वाचन अभियानातून भालगाव शाळेत ज्ञानाची नवी वाट; विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढली

पुढारी वृत्तसेवा

नेवासा: जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत कुसुमाग्रज वाचन अभियान उपक्रमांतर्गत तालुक्यातील जि. प. भालगाव शाळेतील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी दरमहा खाऊचे पैसे एकत्र करत विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी ज्ञान किरण वर्तमानपत्र वाचनालय सुरू केले असून, त्यातून विद्यार्थ्यांना विविध बातम्या, लेख वाचत जगाची वाचन सफर घडत आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या संकल्पनेतून कुसुमाग्रज वाचन अभियान सुरू करण्यात आले आहे. त्या अंतर्गत शाळेतील पदवीधर शिक्षक राहुल आठरे यांनी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी अथवा चौकात असलेली वर्तमानपत्र वाचनालय, पेपर कट्टा संकल्पना स्पष्ट केली.

भालगावात सकाळी वर्तमानपत्र येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर वाचायला मिळत नव्हता. ही समस्या सोडवत शिक्षक राहुल आठरे यांनी पुढाकार घेत अल्पखर्चिक असे भिंतीला खिळे व तार ठोकून पेपर ठेवण्याची व्यवस्था करत वर्तमानपत्र वाचनालय सुरू करण्याची संकल्पना मांडली. यास पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊच्या पैशातून वर्तमानपत्र वाचनालय सुरू करायचे ठरवले. यासाठी दरमहा एक विद्यार्थी प्रतिनिधी नेमत वाचनालयाचा जमा-खर्च वहीत नोंदी ठेवल्या जातात.

या वेळी सेवानिवृत्त शिक्षक दादासाहेब खरात, ग्रामविकास अधिकारी वैशाली सानप, माजी विद्यार्थी संघाचे गणेश काळे, सदस्य रवींद्र आहेर, अरुण खरात, सतीश निमसे, ज्ञानेश्वर पवार, रेखा कोरडे, मुख्याध्यापिका सरस्वती लोंढे, शिक्षिका जनाबाई जाधव, शीतल झरेकर, पल्लवी तरवडे, शिक्षक अमोल तुपे आदी उपस्थित होते.

आमच्या गावात, घरी पेपर येत नव्हता. आम्ही सहावीच्या विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून बचत करत नियमित वर्तमानपत्र वाचनालय सुरू केले. पेपर वाचल्यामुळे आम्हाला आपल्या सभोवती परिसरातील, जिल्ह्यात, राज्य आणि देशात सुरू असलेल्या विविध क्षेत्रातील घडामोडी, बातम्या, जाहिराती समजतात. वर्तमानपत्र वाचनाने जनरल नॉलेज मिळते.
दिव्या भागवत, विद्यार्थिनी इ. सहावी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT