

पाथर्डी: पाथर्डी येथील एसटी आगारात डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे बससेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तब्बल 30 बसगाड्या जागेवरच उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे लांबपल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
डिझेलअभावी रविवार सकाळपासूनच आगारातील बहुतांश गाड्या डेपोमध्येच उभ्या राहिल्या. सकाळी साडेआठ वाजताची कल्याण, नऊची नाशिक, अकराची पुणे, दुपारी बारा वाजताची सोलापूर, तसेच दुपारनंतरची वल्लभनगर अशा महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्या धावू शकल्या नाहीत. सकाळी जाणारी मुंबई गाडीला इतर बसगाड्यातून डिझेल काढून ती गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहतुकीचा पर्याय निवडावा लागला. पाथर्डी आगारात एकूण 50 बस असून दररोज सुमारे अठरा हजार किलोमीटरचा प्रवास या गाड्यांद्वारे केला जातो. यासाठी दररोज अंदाजे साडेचार हजार लिटर डिझेलची आवश्यकता असते. आगारासाठी दर तीन दिवसांनी टँकरद्वारे बारा हजार लिटरचा डिझेल पुरवठा केला जातो. मात्र, यावेळी डिझेल मिळण्यात झालेल्या विलंबामुळे संपूर्ण व्यवस्था कोलमडली आहे.
आगार प्रशासनाने शनिवारी डिझेलची मागणी केली असता, संबंधित तेल कंपनीकडून आपल्या आकारानंतर इतरही कंपन्या डिझेल पुरवठा करण्यासाठी त्यांचे नंबर आहे, म्हणून त्यांना प्रथम इतर पंपधारकांना पुरवठा करण्यात येणार आहे. त्यानंतरच आगाराला टँकर मिळेल, असे सांगण्यात आले. सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या एसटी महामंडळाला डिझेल पुरवठ्यात प्राधान्य मिळणे अपेक्षित असताना तसे न झाल्याने ही गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. नियमित जाणाऱ्या बसच्या वेळेची वाट प्रवाशांना बघावा लागली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
या विस्कळीत सेवेमुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. पाथर्डी आगाराचे दररोज सुमारे 9 लाख 60 हजार रुपये उत्पन्न असून, सवलती वगळता रोख उत्पन्न जवळपास पावणे पाच लाख रुपये आहे. मात्र, बस बंद असल्याने या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. आगारात 87 चालक आणि सुमारे 100 वाहक कार्यरत आहेत. बसगाड्या बंद असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना कामावर असूनही प्रत्यक्ष सेवा देता येत नसल्याने ते निष्क्रिय बसून राहण्याची वेळ आली आहे.
खासगी वाहनचालक सरसावले
दरम्यान, पाथर्डी आगारातील सेवा ठप्प असताना इतर जिल्ह्यांतील काही आगारांनी अतिरिक्त फेऱ्या चालवून प्रवाशांना काहीसा दिलासा दिला. मात्र, या परिस्थितीचा फायदा घेत खासगी वाहतुकीने मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढविला आहे. जर डिझेलचा पुरवठा झाला नाही, तर मुक्कामी गाड्यांसह संपूर्ण आगार ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एसटी महामंडळासाठी डिझेल पुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.