नगर: नेवासा तालुक्यातील शिंगवेतुकाई एमआयडीसी परिसरातील कृषी गौरव फर्टीलायझर कंपनीवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने छापा टाकून २१ लाख ८० हजार ४८६ रुपयांचा बेकायदेशीर खत साठा जप्त केला आहे. याप्रकरणी कंपनी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी नीलेश अभंग यांना शिंगवेतुकाई येथील कृषी गौरव फर्टीलायझर कंपनीमध्ये बेकायदेशीर खतनिर्मिती आणि साठवणूक होत असल्याची गोपनीय खबर दि. १५ जून रोजी सायंकाळी मिळाली होती. त्यानुसार नेवासा पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा खत नियंत्रण निरीक्षक वाल्मीक सुडके, कृषी अधिकारी सुहास धस, कृषी विकास अधिकारी विकास काळे आणि पारनेरचे कृषी अधिकारी राहुल कदम यांच्या पथकाने रात्री छापा टाकला.
तेथे वेगवेगळ्या खत कंपन्यांची नावे छापलेल्या तब्बल २ हजार ३४ खतांच्या गोण्या पॅकिंग केलेल्या अवस्थेत आढळल्या. पथकाने तेथे उपस्थित असलेल्या ऋषिकेश तुकाराम वाखारे यांच्याकडे बिलबुक, साठा रजिस्टर आणि ओ-फॉर्म (O-Form) सारख्या अधिकृत कागदपत्रांची मागणी केली. मात्र, संबंधितांना कोणतीही वैध कागदपत्रे सादर करता आली नाहीत. यामुळे हा संपूर्ण साठा बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले.
या मोहिमेसाठी कृषी विभागाचे संचालक (गुण नियंत्रण) सुनील बोरकर, कृषी सहसंचालक बाळासाहेब जेजुरकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक देशमुख आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे व कृषि विकास अधिकारी सुधीर शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
बनावट कंपन्यांच्या नावाने फसवणूक
स्वतःचा परवाना असतानादेखील वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांच्या नावाचा गैरवापर करून, बनावट गोण्यांमध्ये अनधिकृत खत साठवणूक आणि पॅकिंग करून शासनाची व शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केल्याचे या कारवाईत उघडकीस आले आहे. याप्रकरणी नेवासा कृषी अधिकारी तथा खत नियंत्रण निरीक्षक वाल्मीक एकनाथ सुडके यांनी कंपनीचे मालक किरण चंद्रकांत दौंडकर (रा. केडगाव, अहिल्यानगर) यांच्या विरोधात सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पथकाने कंपनीचे मालक किरण दौंडकर यांच्याशी मोबाईलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी घटनास्थळी येण्याचे टाळले.
संबंधित कंपनीला केवळ स्वतःच्या उत्पादनाचा परवाना असताना, त्यांनी इतर कंपन्यांच्या नावाने खतांची बेकायदेशीर पॅकिंग करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. ही कारवाई म्हणजे अनधिकृत आणि बनावट खत विक्री करणाऱ्यांना एक इशारा आहे.नीलेश अभंग, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद
बोगस खतांची निर्मिती, साठवणूक किंवा जादा दराने विक्री होत असल्याचे आढळल्यास अशीच धडक मोहीम राबवून गुन्हे दाखल केले जातील. शेतकऱ्यांनीही खते खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. संशयास्पद वाटल्यास तत्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा.सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी