नेवासा: रस्त्यावरील मोठे-मोठे खड्डे आणि जीव धोक्यात घालून खड्डा चुकवत त्यातून कसाबसा मार्ग काढणारे वाहनधारक, शालेय विद्यार्थी-विद्यार्थी अशी पाणंद रस्त्यासारखी अवस्था सध्या नेवासा तालुक्यातील नेवासा- राहुरी रस्त्यालगतच्या गोणेगाव चौफुली ते गोणेगाव झाली आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीला कधी मुहुर्त सापडणार आहे, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. त्यांनी आता लोकप्रतिनिधींनासाकडे घातले आहे.
दोन-अडीच किलोमीटर अंतराच्या या रस्त्याची सध्या अक्षरशः चाळण झाली असून दररोज होणारे अपघात, बंद पडणाऱ्या गाड्यांना वाहनधारक वैतागले आहेत. हा रस्ता कमी आणि खड्डे जास्त असा झाला असून गोणेगावकरांचा हा जीवघेणा प्रवास थांबणार कधी? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.
नेवासा तालुक्यातील गोणेगाव रस्ता हा वडाळा बहिरोबा-खरवंडी-गोणेगाव चौफुला-गोणेगाव-पाचेगाव ते श्रीरामपूर असा शॉर्टकट आहे. या रस्त्यावर चारचाकी, दुचाकींसह सर्वच वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, खडी उघडी पडली आहे. साईडपट्ट्याही उघड्या पडल्याने या रस्त्यावर सातत्याने अपघाताच्या मालिका पाहायला मिळत आहेत. गोणेगाव चौफुली ते गोणेगाव रस्त्याची दुरवस्था ही वाहनचालकांची मोठी समस्या आहे. या रस्त्याची डागडुजी अल्पआयुषी ठरली असून, रस्त्याची दुरुस्तीच करूनही रस्त्याची अवस्था जैसे थेच राहत असल्याने खड्डे दुरुस्तीवर होणारा खर्च मातील गेला आहे.
लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ कार्यकर्ते बाबूराव रोडे, प्रा. गोवर्धन रोडे, गोकुळ चिंधे, दिनकर काळे, अनिल काळे, प्रकाश रोडे, राहुल रोडे यांच्यासह गोणेगावकरांनी व्यक्त केली आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शेटे यांनी दिला आहे.
गोणेगाव चौफुला ते गोणेगाव रस्तादुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीने संबंधित विभागाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला. रस्ता दुरुस्त न झाल्यास जनआंदोलन उभारण्यात येईल.रावसाहेब दिघे, सरपंच, गोणेगाव
गोणेगाव चौफुला ते गोणेगाव रस्त्यावरून माझा दररोजचा प्रवास कसरतीचा ठरत आहे. अनेक वेळा लहान-मोठे अपघात झाले आहेत. या रस्त्यावर वाहन चालविणे जीवघेणा खेळ ठरत आहे.किरण शेटे, ग्रामस्थ