कर्जत: अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मांदळी गावच्या शिवारात बुधवारी रात्री झालेल्या हल्ल्यामुळे वातावरणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राम खाडे यांच्यावर तालुक्यातील मांदळी शिवारात दगड व धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात खाडे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले अन्य काही जण जखमी झाले. या वेळी हल्लेखोरांनी खाडे यांची आलिशान कारची (एमएच 46 सीआर 7744) मोठ्या प्रमाणावर तोडफोड केल्याचे सांगण्यात आले.
याबाबत समजलेली माहिती अशी ः राम खाडे हे नगर-सोलापूर मार्गाने कारने जात होते. त्या वेळी मांदळी शिवारात पाटील ढाबा परिसरात ते थांबले असताना चेहऱ्याला रुमाल बांधलेले दहा-पंधरा जणांचे टोळके, अचानक तेथे आले आणि त्यांनी खाडे यांच्यावर हल्ला चढवला. कोयते आणि दगडांनी केलेल्या या हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले. त्यांच्या सोबत असलेले काही जणही जखमी. हल्ल्यानंतर आरोपी पळून गेले. दरम्यान, जखमी राम खाडे यांना पुण्यातील रुग्णालयात आणि इतर जखमींना नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना खाडे म्हणाले, की आम्ही आमच्या भागात झालेल्या कामांमधील गैरकारभार आणि चुकीची कामे उघड केली. त्यामुळे राजकीय हेतूने आमच्यावर हल्ला झाला आहे. हल्ला कोणी केला हे सर्वांना माहीत आहे, असेही ते म्हणाले.
राम खाडे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून, त्यांच्या कारचेही नुकसान झाले आहे. कार पोलिस स्टेशनमध्ये आणली आहे. आम्ही रुग्णालयात जाऊन काही जखमींशी चर्चा केली. त्यांनीच या प्रकरणी राम खाडे फिर्यादी होणार असल्याचे सांगितले, मात्र अद्याप कोणतीही लेखी फिर्याद प्राप्त झालेली नसल्याने गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.विजय झंझाड, पोलिस उपनिरीक्षक