संगमनेर: राजकीय स्वार्थामुळे नाशिक-पुणे रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला. तांत्रिक कारण न सांगता मार्ग बदलल्याचा आरोप करत संगमनेरमार्गेच रेल्वेसाठी जनआंदोलन उभारण्याचा इशारा आमदार सत्यजित तांबे यांनी गुरुवारी दिला.
नाशिक-पुणे रेल्वे शिर्डी, अहिल्यानगर मार्गे जाणार असल्याची घोषणा लोकसभेत रेल्वेमंत्र्यांनी केल्यानंतर व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये गुरुवारी सायंकाळी सर्वपक्षीय बैठक झाली. तीत जनआंदोलन उभारण्याचा निर्धार केला.
यावेळी आमदार सत्यजित तांबे, राजाभाऊ अवसक, हिरालाल पगडाळ, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश लाहोटी, प्रकाश कलंत्री, डॉ. मैथिली तांबे, बाळकृष्ण महाराज करपे, अमर कतारी आदी उपस्थित होते.
आ. तांबे म्हणाले, की नाशिक-पुणे रेल्वे मंजूर झाल्यानंतर या भागात भूसंपादन करण्यात आले. शेतकऱ्यांना पैसेही देण्यात आले; मात्र राजकीय डाव साधत जीएमआरडीचे कारण सांगून रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट घातला जात आहे. जगामध्ये पंधरा ठिकाणी जीएमआरडीच्या प्रोजेक्टजवळून रेल्वे गेलेली आहे. त्यामध्ये कुठलीही अडचण नाही. याचा कोणताही अभ्यास केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी केलेला नाही. हा पुण्याहून पुणतांबा असा उलटा प्रवास असून नाशिक-पुणे रेल्वे ही संगमनेर, मंचर, चाकण मार्गे झाली पाहिजे. यासाठी मोठा लढा उभारण्यात येणार आहे.
शुक्रवारपासून तालुक्यात सह्यांची मोहीम, डिजिटल कॅम्पिंग व ऑनलाई पिटिशन दाखल करण्यात येणार असून यात सर्व नागरिकांनी राजकारण विरहीत सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, या बैठकीत खासदार अमोल कोल्हे यांनी आमदार तांबे यांना फोन करून रेल्वेसाठीच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याची ग्वाही दिली.
नाशिक-पुणे रेल्वेचे सर्वेक्षण पूर्ण होऊन शेतकऱ्यांना पैसेही दिले. मात्र सरकार बदलले आणि रेल्वेचा मार्ग पळवला गेला. विकासकामात होणारे राजकारण चुकीचे आहे. नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर मार्गेच झाली पाहिजे. त्यासाठी मोठे जनआंदोलन उभारू. राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकजूट दाखवण्याची ही वेळ आहे.बाळासाहेब थोरात, माजी मंत्री