

कोपरगावः कोपरगाव पोस्ट ऑफिस परिसरात सध्या जणू हिरवा स्वर्ग अवतरल्याचा भास होत आहे. पोस्ट कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून उभारलेला हा देखणा उद्यान विभूषण परिसर शहरवासीयांसाठी अनोखा हरित आनंदोत्सव ठरत आहे. पोस्ट कार्यालयात पाऊल टाकताच दरवळणारा फुलांचा सुगंध, दाट हिरवाईची झुल, कानांना तृप्त करणारा पक्ष्यांचा किल-बिलाट हे तिन्ही सौंदर्य मिळाल्यामुळे जणू निसर्ग थेट आशीर्वाद देत असल्याचा अनोखा भास निर्माण होत आहे.
2002 सालामध्ये केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली 10 गुंठे जागेत उभारलेली पोस्ट इमारत आज हरित सौंदर्याच्या मुकूटाने उजळली आहे. पोस्टमास्तर राजेश नेतनकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली तब्बल 20 कर्मचाऱ्यांनी एकदिलाने तब्बल दीडशेहून अधिक रोपे लावून, या परिसराला नवे जीवनदान दिले आहे. चाफा, कन्हेर, गुलमोहर, निलमोहोर, कांचन, पिंपळ, बदाम, लिंब, डान्सिंग ट्री या पारंपरिक शोभेच्या झाडांसह रोजिया, टेबेबिया / हंडूर, रौप्यपर्णी आर्जेन्टिया यासारख्या आकर्षक व दुर्मिळ प्रजातीची वृक्ष बागेला विलक्षण सौंदर्याची सोनेरी चौकट प्राप्त करून देत आहेत. प्रत्येक झाड जणू स्वतःचा वेगळा नाजूक थाट घेऊन, डौलात उभे आहे, भास निर्माण होत आहे.
संपूर्ण हरित-नंदनवनाचे खरे माळी, खरे कलाकार बापूसाहेब चव्हाण आहेत. त्यांचे कष्ट, प्रेम व निसर्गाबद्दल जिव्हाळ्याची उमेद या बागेतील प्रत्येक पाना-फुलात जिवंत भासत आहे. बोरवेल, वीज मोटारपंप, कंपाउंड यासर्व सोयी पोस्ट कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खिशातून उभारल्या आहेत, हे विशेष! प्रत्येक रोपटे सुरक्षित, सुस्थितीत व निरोगी वाढत आहे. आठवड्यातून राबविले जाणारे स्वच्छता अभियान या संपूर्ण बागेला ताजेपणाचा दरवळ कायम देत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात अशाप्रकारे जोपासलेली, सुशोभित व निगुतीने सांभाळलेली पोस्ट कार्यालयाची बाग बहुदा कोपरगावात पहिली असावी, असा दुग्धशर्करा योग येथील नागरिक अभिमानाने व्यक्त करीत आहेत. उद्योजक मुनीश ठोळे व राजेश ठोळे यांनी पुढाकार घेवून, स्प्रिंकलर सिंचण प्रणाली बसवून, दिल्यामुळे बागेची सिंचन व्यवस्था आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे. हरित उपक्रमाची एकत्रित बीजे वृक्षरूप धारण करीत आहेत. कोपरगाव पोस्ट ऑफिस परिसर ‘हरित पोस्ट’चा मानबिंदू, कर्मचाऱ्यांच्या कष्ट, समर्पण व न विझणाऱ्या जिद्दीचे जिवंत स्मारक ठरला आहे.