Pune Nashik High-Speed Rail Pudhari
अहिल्यानगर

Nashik Pune High Speed Rail: नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्गाचा अभ्यास डॉ. अनिल काकोडकर यांच्या समितीकडे; राज्य शासनाचा निर्णय

जीएमआरटीवरील संभाव्य परिणामांची होणार सखोल तपासणी; मार्गाबाबत तज्ज्ञ समिती सादर करणार अहवाल

पुढारी वृत्तसेवा

नगर: नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्गाबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने तज्ज्ञ समिती स्थापन केली असून, जेष्ठ शास्त्रज्ञ तथा भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला. रेल्वे बोर्डाचे सदस्य विवेक गुप्ता आणि पुणे व नाशिकच्या विभागीय आयुक्तांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.

नाशिक-पुणे रेल्वेमार्ग सिन्नर - संगमनेर - नारायणगाव या मार्गे करण्याचा आराखडा पूर्वी जाहीर झाला होता. मात्र नारायणगावजवळ खोडद येथे असलेल्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) वर आणि त्याद्वारे करण्यात येणाऱ्या अवकाश संशोधनावर या रेल्वेमार्गामुळे परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे नाशिक-पुणे रेल्वेचा मार्ग बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आणि हा मार्ग नाशिक - सिन्नर - शिर्डी - अहिल्यानगर - पुणे असा करण्याचा नवा आराखडा जाहीर करण्यात आला.

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले. नारायणगावजवळील रेडिओ दुर्बिणीवर रेल्वेमार्गाचा खरेच परिणाम होणार का, असेल तर किती आणि तो टाळून रेल्वेमार्गाची आखणी शक्य आहे का, याबाबत अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याची आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी त्या वेळी विखे पाटील आणि शिष्टमंडळाला दिली होती.

त्यानुसार आज (बुधवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय शासन निर्णयाद्वारे जाहीर केला. या समितीला नियोजित रेल्वेमार्गाच्या प्रकल्प आराखड्याची सर्व माहिती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ‘महारेल’वर सोपविण्यात आली आहे. नाशिक आणि पुणे विभागीय आयुक्तांनी समितीला आवश्यक सर्व सहकार्य द्यावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नाशिक-पुणे रेल्वेमार्गाबाबत जनतेची भावना लक्षात घेऊन उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत करतो आणि याबद्द्ल मुख्यमंत्र्याचे आभार मानतो. या प्रकल्पाचा पाठपुरावा सर्व लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन निश्चित करणार आहे.
राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT