नगर: शहरातील प्रभाग क्रमांक 13 व 14 मध्ये गेल्या महिन्याभरापासून सुरू पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्याला नागरिक वैतागले असून, येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नूतन नगरसेवकांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहेे.
नवनिर्वाचित नगरसेवक गणेश भोसले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक सुरेश बनसोडे, माजी नगरसेवक संजय चोपडा, विपुल शेटिया, सामाजिक कार्यकर्ते गोरख पडोळे यांनी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात म्हटले की, गेल्या एक महिन्यापासून मार्केट यार्ड, माळीवाडा, टिळक रोड, सारसनगर, भवानीनगर, भोसले आखाडा, माणिक नगर, कोठी रस्ता व बुरुडगाव रोड परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रासले आहेत.
येत्या आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नागरिकांच्या वतीने महापालिकेत तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. निवडणुकीच्या काळात नागरिकांकडून पाणीटंचाईबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, निवडणूक झाल्यानंतरही स्थितीत बदल न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
काही तांत्रिक कारणांमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून तो शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्यात येईल. त्यासाठी पाणीपुरवठा विभागाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.यशवंत डांगे, आयुक्त महापालिका