

संगमनेर: तालुक्यात शासनाच्या घरकुल योजनेच्या नावाखाली अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे. अशा पद्धतीने गौण खनिजांचे उत्खनन करणारी व्यक्ती कोणत्याही पक्षाशी संबंधित असली, तरी तिची गय न करता कठोर कारवाई करावी, अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळ यांनी महसूल व पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या.
आमदार खताळ म्हणाले, शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक गावात घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू देण्यात आली आहे. मात्र, काही वाळू तस्कर घरकुल योजनेचा गैरवापर करून अवैध वाळू उपसा करत आहे. अशा प्रकारे वाळू तस्करांवर कारवाई करा, अशा सुचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही महसूल, पोलिस व परिवहन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून घरकुल योजनेच्या नावाखाली प्रवरा, मुळा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध चोरटी वाळू वाहतूक सुरू आहे. पिंपरणे, म्हाळुंगी नदी पात्रात अवैध वाळू उपसा करताना मोठी कारवाई करण्यात आली.
रस्ते खोदून वाळूतस्करांची कोंडी
संगमनेर मतदारसंघात विविध गावांमधून प्रवरा नदीच्या पात्राकडे जाणारे रस्ते खोदून बंद केले आहेत. अवैध वाळू उपसा करणाऱ्यां विरोधात महसूल प्रशासनामार्फत कारवाई सुरू आहे. वाळू तस्करीसाठी वापरण्यात येणारी वाहने व साहित्य जप्त करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश महसूल व पोलिस प्रशासनाला दिले आहे, असे आ. खताळ म्हणाले.
कोणत्याही पक्षाचा असो, गुन्हे दाखल करा
अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करणारी व्यक्ती कोणत्याही पक्षाची असो, तिची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. खऱ्या अर्थाने गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळाली पाहिजे, मात्र त्यांच्या नावाखाली कोणीही गैरफायदा घेऊ नये. या प्रकरणात काही जणांवर गुन्हे दाखलही करण्यात आले आहे.